पंचवटी : पेठरोडवरील आरटीओ तसेच अश्वमेघनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून दिवसा व रात्रीच्या सुमाराला भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सदर प्रकार घडत असला तरी याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पेठरोड परिसरात दाट लोकवस्ती असून, सध्या परिसरातीलच काही भुरटे चोर नागरिकांच्या घराबाहेर ठेवलेल्या वस्तूंवर डल्ला मारत असल्याने घराबाहेर वस्तू ठेवाव्यात की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सध्या भुरटे चोर घराबाहेर वाळवणीवर टाकलेले कपडे, उभ्या वाहनांचे सिम्बॉल, तसेच अन्य वस्तू उचलून नेत असल्याने नागरिकांचे नुकसान होत आहे. भुरटे चोर कधी खिडकीत ठेवलेले कपडे, वस्तू चोरून नेण्याचेही धाडस करत असल्याने या भुरट्या चोऱ्यांवर आळा बसविण्यासाठी पोलिसांनी भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेकडो नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ
By admin | Published: December 22, 2015 10:30 PM