वणी : शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय पातळीबरोबर ग्रामपालिका स्तरावरही पाठपुरावा करणे गरजेचे आहे. हे काम प्रगतिपथावर असले तरी ते लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सन २००७-०८ साली दोन कोटी ८० लाख रु पयांच्या अंदाजपत्रकाची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. आदिवासी उपयोजनेतून मंत्रालय स्तरावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा समितीकडे ठेकेदाराच्या माध्यमातून ही जबाबदारी सोपविण्यात आली; मात्र निधीच्या उपलब्धतेनुसार पाच किलोमीटर नऊशे मीटर अंतरासाठीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यात साडेतीन किलोमीटर अंतराची जलवाहिनी बुजविण्यात आली. तद्नंतर निधीअभावी सदरचे काम बंद पडले. सन २०११ साली बंद पडलेले काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी चार कोटी ७३ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली; मात्र पूर्वीचे दोन कोटी ८० लाख रुपये यातून वजावट करण्यात आले. १.६ क्षमतेचे जलशुिद्धकरण केंद्र, साडेतीन लक्ष लिटरचा जलकुंभ, वितरण व्यवस्था, बोरीचा पाडा व टेकाडीपाडा या भागासाठी स्वतंत्र जलवाहिनीद्वारे वितरण व्यवस्था अशा कामांचा त्यात समावेश आहे. पंपिंग मशीनच्या कामाचाही त्यात अंतर्भाव आहे. १ सप्टेंबर २०१५ पासून ते १८ महिन्यांच्या कालावधीत सदरचे काम ठेकेदारामार्फत पूर्ण करणे बंधनकारक आहे. निर्धारित वेळेत काम न केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करारनाम्याच्या अटी व शर्तीनुसार आहे. आजच्या स्थितीत १५२० घरगुती व व्यावसायिक नळ कनेक्शनधारक आहेत. त्यांच्याकडून सुमारे १५ लाख रुपये वर्षाकाठी कररूपाने उत्पन्न मिळते. मात्र पाणीपुरवठा कर्मचारी पगार व वीजबिल ४० लाख रुपयांच्या घरात वार्षिक आर्थिक तरतुदीत जाते. नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर २४ तास पाणीपुरवठा करण्याचे ग्रामपालिकेचे नियोजन असले तरी भविष्यात हा खर्च दुपटीने वाढू शकतो. त्यामुळे हा पांढरा हत्ती पोसणे आर्थिक दृष्टिकोनातून आव्हानात्मक बाब आहे. वणी- पिंपळगाव रस्त्यावर दोन लाख लिटर, टेकाडीपाडा एक लाख लिटर, बोरीचा पाडा पन्नास हजार लिटर, दत्तनगर दहा हजार लिटर, जगदंबानगर दहा हजार लिटर, विश्रामबाग पाडा पंचवीस हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ कार्यान्वित आहेत. वणीचा वाढता विस्तार, पाण्याचा वापर याचा समन्वय साधून पाण्याची गरजपूर्तीपेक्षा पाण्याचा वापर अधिक आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता, वितरण व्यवस्था, नियोजन आखण्यासाठी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी गतिमानता देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
वणी येथे वाढीव पाणीपुरवठ्याचे काम प्रगतिपथावर
By admin | Published: December 08, 2015 11:51 PM