येवला : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात आजवर ६७ हजार ६१४ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकºयांनी यंदा तूर, बाजरी, ऊस या पिकांना काहीशी बगल देऊन मका, सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद पिकांकडे आपला मोर्चा वळवला. गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे.यंदा पावसाळा उशिराने सुरू झाला. रिमझिम पावसाच्या भरवशावर खरिपाची पेरणी झाली. मात्र आता दाणे भरण्याचे दिवस असताना पावसाने दडी मारली आहे. उशिरा पेरणी झालेली पिके ऊन धरू लागली आहे. शेतीचक्र बिघडलेल्या तालुक्यातील बळीराजाला यंदा पावसाची प्रतीक्षा करावी लागली. येवला तालुक्याच्या पूर्व भागातील अंदरसूल, भारम, देवदरी, डोंगरगाव, रास्ते सुरेगाव, अंगुलगाव आदी गावात खरिपाच्या पिकांना आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. तालुक्याच्या पाटोदा, सावरगाव परिसरात उशिरा पेरणीलायक पाऊस झाल्याने शेतकºयांनी पेरणी थोडी उशिराने केली. मात्र पावसाने दडी मारल्याने पुन्हा पिके अडचणीत सापडली आहेत. जुलैच्या मध्याला दुबार पेरणीची वेळ ओठवली होती. त्यानंतर जुलैअखेर रिमझिम पावसाने पुन्हा पिके जगवली. मात्र आॅगस्टमध्ये पावसाचा पत्ताच नाही. पुन्हा पावसाने दडी मारली मारल्याने चिंता वाढली आहे. यंदाच्या खरीप हंगामात मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, कापूस, तूर, मूग अशी पिके तालुक्यातील शेतकºयांनी घेतली. यावर्षी तालुक्यातील शेतकºयांनी नगदी पीक मका, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांना प्राधान्य दिले. गेल्या वर्षीच्या तुलनेत मका, मूग, सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. उडीद, भुईमुगाला शेतकºयांनी आपलेसे केले आहे. मागील वर्षी दरात सुधारणा झाल्याने कपाशीचे क्षेत्र यंदा थोडे वाढले आहे. बाजरी, तुरीबाबत भावाचा अनुभव लक्षात घेता शेतकºयांनी या पिकाबाबत काहीसा आखडता हात घेतल्याचे दिसत आहे. मुग काढून कांदे करावे अशी मानिसकता आजही दिसत आहे.६७ हजार हेक्टर पेरण्यातालुक्यात कृषी विभागाच्या दप्तरी खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५४ हजार २३३ हेक्टर असून, यंदा यात वाढ होऊन ६६ हजार हेक्टरवर पेरण्या अपेक्षित होत्या. मात्र गत साप्ताहात तब्बल ६७ हजार ६१४ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
अल्पपावसात येवल्यात खरिपाच्या क्षेत्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:57 AM