सिडको : मागील काही दिवसांपासून सिडको व परिसरात घरफोडी, जबरी चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून, गुन्हेगारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी मध्यरात्री एका सोसायटीच्या वाहनतळात लावलेली दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी जाळल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातारवण पसरले आहे.अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी गुन्हे शाखेच्या युनिट दोनमध्ये काम करणारे कुमार चौधरी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. चौधरी यांनी सुमारे दीड वर्षाहून अधिक काळ गुन्हे शोध पथकात (युनिट-२) काम केले असले तरी ते सिडको व परिसरातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात यशस्वी होतील, असे बोलले जात आहे. परंतु अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांनी डोके वर काढले असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सिडको भागातील मुख्य चौक तसेच नागरी वस्तीत असलेली उद्याने टवाळखोरांचे अड्डे झाले आहेत. या उद्यानातच टवाळखोर दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या टवाळखोरांची दहशत वाढल्याने महिला व मुलींना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. पोलीस आयुक्तांनी शहरातील आॅनलाइन जुगार असलेल्या रोलेट पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिलेले असताना काही पोलीस अधिकाऱ्यांच्या संमतीने हा जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे बोलले जात आहे.सिडकोतील वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जुगाराबरोबरच पत्त्याचे क्लब व इतर अवैध धंदे जोरात सुरू असल्याने याबाबत पोलीस आयुक्तांनी लक्ष घालण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.गुन्हेगारी मोडीत काढावीसिडको भागात दुचाकी जाळपोळीच्या घटना याआधीही अनेकदा घडल्या असून, दुचाकी जाळपोळ करून दहशत पसरविण्याचा प्रकार समाजकंटकांकडून केला जात आहे. सिडको भागातील गुन्हेगारी मोडीत काढण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. आता याबाबत काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शाळा तसेच महाविद्यालयीन मुले रोलेट जुगार मोठ्या प्रमाणात खेळत असून, यासाठी एका एजंटच्या माध्यमातून हा आॅनलाइन जुगार सुरू असून, यामुळे मुलांना अधिक पैसे मिळण्याची अपेक्षा निर्माण होते. यातूनच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीचेही प्रकार घडत आहेत. या आॅनलाइन जुगारासह अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले पत्त्याचे क्लब व इतर अवैध व्यवसाय सुरू असून, याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
गुन्हेगारी वाढल्याने सामान्य नागरिक भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 1:44 AM