नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याला १४ जुलैला आरंभ झाल्यानंतर शहरात बाहेरून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून, साधुग्राममध्येही हळूहळू साधूंचे आगमन होऊ लागले आहे. या गर्दीसोबतच शहरात कचऱ्याचेही प्रमाण वाढत असल्याने सध्या महापालिकेच्या खतप्रकल्पावर दररोज ४३० मे. टनपेक्षा अधिक कचरा आणला जात आहे. कचरा संकलनात वाढ झाल्याने महापालिका प्रशासनाने खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याच्या दृष्टीने तयारी चालविली असून, गोदाघाट व साधुग्राम परिसरात घंटागाड्यांचीही संख्या वाढविण्यात आली आहे.१४ जुलैला सिंहस्थ कुंभमेळ्यास आरंभ झाल्यानंतर देश-विदेशातून भाविक व पर्यटकांचा लोंढा शहराकडे येऊ लागला आहे. तपोवनात उभारण्यात आलेल्या साधुग्राममध्येही प्रमुख तीनही आखाड्यांसह त्यांच्या खालशांचे तसेच धार्मिक संस्थांचे मंडप उभे राहत असून, मोठ्या संख्येने साधू-महंत दाखल होत आहेत. वाढत्या गर्दीबरोबरच शहरात कचराही वाढत असून, महापालिकेकडून घंटागाड्यांमार्फत होणाऱ्या कचरा संकलनात वाढ होत आहे. सर्वसाधारणपणे शहरात सहाही विभागातून दररोज सुमारे ३६० ते ३९० मे. टन कचरा संकलित करून तो खतप्रकल्पावर प्रक्रियेसाठी पाठविला जातो; परंतु गेल्या १५ ते २० दिवसांत कचरा संकलनात वाढ झालेली असून, तो ४३० ते ४४० मे. टनपर्यंत जाऊन पोहोचला आहे. महापालिकेच्या खतप्रकल्पाची क्षमता ५०० मे. टन इतकी आहे. त्यातही खतप्रकल्प सध्या पूर्णक्षमतेने चालविला जात नसल्याने प्रकल्पावर कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. आता पर्वणीकाळात शहरावर गर्दीचा मोठा ताण पडणार असून, त्यातून कचऱ्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासंबंधी तयारी चालविली असून, रामकुंड, गोदाघाट तसेच साधुग्राम परिसरात २७ घंटागाड्या तैनात ठेवल्या आहेत. भाविकांनी कुठेही कचरा टाकू नये यासाठी महापालिकेमार्फत गोदाघाट व साधुग्राम परिसरात २०० निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यापैकी सध्या १२० निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवण्यात आले आहेत. स्वच्छतेसंबंधी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनाही जागरूक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
शहरात वाढता वाढे कचरा
By admin | Published: August 09, 2015 11:41 PM