नाशिक : पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टॅँकरच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असून, उन्हाचा तडाखा वाढताच धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली आहे. नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण व येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई भासू लागली असल्याने टॅँकर मागणीत वाढ झाली आहे. येवला व बागलाण या दोन तालुक्यांना जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासू लागलेली असताना प्रशासनाने निव्वळ आडमुठेपणामुळे टॅँकर मंजूर करण्यास तब्बल दीड महिना टाळाटाळ केली. फेब्रुवारीच्या अखेरीस प्रशासनाने टॅँकरला मंजुरी दिली असली तरी, अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. उलट मार्चअखेरपासून जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअस तपमान गाठल्यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झाली. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात ५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर खुद्द गंगापूर धरणात ५९ टक्के पाणी असल्याने नाशिककरांना दोन महिने चिंता करण्याची तशी गरज नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दारणा धरणात ७१ टक्के साठा असून, मे महिन्यात नगर व औरंगाबाद जिल्ह्यासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. गिरणा खोºयात ३० टक्के, तर पालखेड धरण समूहात ३४ टक्केच पाणी शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, येवला व सिन्नर या चार तालुक्यांतील २१ गावे व एक वाडीसाठी १३ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, येवला तालुक्यातील १३ गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. पाणीटंचाई भासणाºया गावांमध्ये गारखेडे, सोमठाण गणेश, सायगाव, कोटखेडे, वसंतनगर, गोरखनगर, पांजरवाडी, शिवाजीनगर, रेंडाळे, आडसुरेगाव, भुलेगाव, अनकाई या गावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्णात फक्त ८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यात बागलाणला ७ व मालेगावच्या १ टॅँकरचा समावेश होता. त्यामानाने गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही यंदा ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.
उन्हाचा तडाखा वाढताच टॅँकरची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 1:24 AM