मनमाड शहरात सध्या ३८ तर नांदगाव शहरात ८३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मार्च-एप्रिल महिन्यात सरासरी ५०० ते ७५० दरम्यान पॉझिटिव्ह रुग्ण होते. मात्र, दोन्ही ठिकाणी नगर परिषद प्रशासनाने मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या. त्यामुळे प्राथमिक लक्षणे दिसत असताना उपचार सुरू झाले. त्या सर्वांना लक्षणानुसार संस्थात्मक विलगीकरण व हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने अल्पावधीत कोरोनाचा प्रसार मर्यादेत आला. दरम्यान, शासनाने कडक निर्बंधांचे नियम काही प्रमाणात कडक केले. परंतु, प्रभावी अंमलबजावणी अद्यापही होत नसल्याचे चित्र आहे. व्यावसायिक प्रतिष्ठाने व दुकाने दिलेल्या वेळेचे पालन नीट करत नसल्याने रस्त्यावर ग्राहकांच्या गर्दीत ‘रिकामे’ फिरणारे घोळक्यांत भर घालताना आढळून येतात. अनेक दुकानदार रस्त्यावर त्यांचे टेहळे ठेवतात. अंमलबजावणी पथक येताना दिसले की, ग्राहकांना आत घेऊन ताबडतोब शटर खाली करून बंद असल्याचा भास निर्माण केला जातो. नगरपरिषद व पोलीस प्रशासनाचे त्याकडे साेयीस्कर दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
इन्फो
मूळडोंगरीत रुग्णसंख्येत घट
मूळडोंगरी येथे मागच्या महिन्यात १०२ कोरोनाबाधित रुग्ण होते. आज तिथे फक्त पाच पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पाॅझिटिव्ह निघाला की, शाळेतच पाठवायचे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवता आले. सावरगावच्या ग्रामस्थांनी पाहुणा आला की थेट शाळेतच पाठवायचा, हे धोरण राबविले. मात्र असे सगळ्या गावांत घडत नाही. त्यामुळे सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी दिले आहेत.
इन्फो
बाधिताचा दर २३ टक्के
आरोग्य विभागामार्फत एप्रिल महिन्यात ग्रामीण भागात ५०६५ आरटीपीसीआर टेस्ट व ४३१९ ॲटीजेन टेस्ट करण्यात आल्या. एकूण ९३८४ त्यापैकी २१८० नमुने पॉझिटिव्ह आले. हा दर २३ टक्के आहे. तो १५ टक्क्यापर्यंत खाली आणणे गरजेचे आहे.
कोट....
ग्रामीण भागात अद्याप २७८ रुग्ण आहेत. टेस्टिंग वाढवले तर ही संख्या दुप्पट दिसू शकते. संस्थात्मक विलगीकरणासाठी लोक जाण्यास तयार होत नाहीत. घरीच विलगीकरणात राहू असा आग्रह धरतात. ग्रामीण भागात घरातले अंतर कमी असते. एकच शौचालय कुटुंबातले सगळे सदस्य वापरतात. त्यामुळे एकाकडून इतरजण बाधित होतात आणि कोरोनाची साखळी वाढत जाते. जि.प.च्या शाळा विलगीकरणासाठी प्रमाणित केल्या आहेत. मात्र, बाधित त्याठिकाणी जाऊन राहत नाहीत.
-डॉ. अशोक ससाणे, तालुका वैद्यकीय अधिकारी