नाशिक : शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रिया अंतर्गत पहिल्या सोडतीत निवड झालेल्या ४ हजार ५७६ प्रवेश अर्जांपैकी अद्यापही १४३ प्रवेश प्रक्रियेत असून, पहिली फेरी पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवूनही मंगळवारी संध्याकाळपर्यंत प्रक्रिया अपूर्णच राहिली आहे. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत मुख्याध्यापकांकडून पूर्ण होण्याची प्रतीक्षा असून, उर्वरित प्रवेशांची संख्या शून्य झाली नाही, तर शिक्षण मंडळाकडून बुधवारी (दि.२२) दुपारपर्यंत मुख्याध्यापकांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षणहक्क प्रवेशासाठी ६ मार्च रोजी शासकीय कन्या विद्यालयात सोडत काढण्यात आल्यानंतर १७ मार्चपर्यंत मुख्याध्यापकांनी प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु ही प्र्रक्रिया पूर्ण न झाल्याने २१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित राहिलेले १०६२ प्रवेश शून्य करण्याचा प्रयत्न मुख्याध्यापकांनी केला. परंतु, मंगळवारपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. अद्यापही १४३ प्रवेश प्रक्रियेत असून, ते शून्य करण्यासाठी बुधवारी दुपारपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता शिक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. उर्वरित प्रवेश शून्य करण्यासाठी बुधवारी केंद्रप्रमुख तथा गटप्रमुख शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या भेटी घेऊन प्रकिया पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुदत वाढवूनही शिक्षणहक्क प्रक्रिया अपूर्णच
By admin | Published: March 22, 2017 1:16 AM