मालेगाव : शहरातील सोयगावसह नववसाहत भागात मोठ्या प्रमाणात चोऱ्या वाढल्या असून घराशेजारी लावलेल्या दुचाकी लंपास केल्या जात असल्याने पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. सोयगाव, कॅम्प, नववसाहत भागात व्यापारी, नोकरदार राहतात. कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून चोरटे डल्ला मारतात. मोकळ्या भूखंडांवर काटेरी झुडपे असल्याने महापालिकेने झुडपे काढावीत. घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहेत.
सायने विद्यालयाचे सुयश
मालेगाव : राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यार्थी गुणवत्ताधारक यादीत आले. २५ विद्यार्थ्यांमधून १६ विद्यार्थी पात्र व ३ विद्यार्थी गुणवत्ता शिष्यवृत्ती यादीत आले. नीलम चुडामल खेडकर ७५ टक्के, पूर्वा संदीप देवरे ६९ टक्के ग्रामीण सर्वसाधारण, प्रणव शिवराम बच्छाव ६८ टक्के ग्रामीण सर्वसाधारण. मुख्याध्यापक एच. टी. खैरनार, एस. एन. अहिरे, आर. एस. हिरे, एस. के. देवरे यांनी मार्गदर्शन केले.
--------
पाटणेत नेत्र तपासणी शिबिर
पाटणे : येथे भाजप जिल्हा वैद्यकीय सेलतर्फे घेण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबिरात १५० जणांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. उद्घाटन जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद पवार, डॉ. भरत वाघ, सरपंच राहुलाबाई अहिरे आदी उपस्थित होते. डॉ. सुयोग उघाडे, डॉ. राजेंद्र भामरे यांनी नेत्र तपासणी केली.
-------
कॅम्पात पाण्याची वेळ बदलण्याची मागणी
मालेगाव : मालेगाव कॅम्पात प्रभाग क्र. १८ मध्ये मेनरोड शांती निकेतन चौक, मोडक गल्ली पूर्वी सकाळी सव्वाचार वाजता पाणीपुरवठ्याची वेळ होती. ती बदलून सव्वाबारा वाजेची करण्यात आलेली आहे. दुपारी घरी कुणी राहत नसल्याने गैरसोय होत आहे. यासाठी पाण्याची वेळ पूर्वीप्रमाणे बदलण्यात यावी, अशी मागणी आनंद पवार, भीमा भडांगे यांनी केली आहे.
-------
भोलेनाथ बाबा ट्रस्टतर्फे महंताई समारोह
मालेगाव : येथील चाळीसगाव फाट्यावर पंचमुखी मारुती महादेव भोलेनाथ बाबा टेम्पल ट्रस्टतर्फे महंताई समारोह संपन्न झाला. महंत रामेश्वरदास गुरू हरिदासजी यांचा चादरविधी झाला. यावेळी बागलाण संत-महंत मंडळाचे संत पवनदास गुरू, रामस्नेहिदास, शंकरदास, महंत रामकिशोरदास आदी उपस्थित होते.
--------
श्वान चावल्याने बालक गंभीर जखमी
मालेगाव : शहरातील बडी मालेगाव हायस्कूलजवळ मोहंमद अरहान मो. माजिद (४) या बालकास श्वानाने चावा घेतल्याने गंभीर जखमी झाला आहे. या भागात मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला असून, महापालिकेने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
-------