नाशिकरोड : धावपळ आणि वाढत्या ताणतणावांमुळे अनेक प्रकारच्या आजारांमध्ये वाढ होत असून, विविध पॅथींचे उपचार घेऊनही आरोग्यात सुधारणा होत नसल्याने निसर्गोपचाराकडे नागरिकांचा कल वाढला आहे.जयभवानीरोड येथे १५ वर्षांपूर्वी नाशिक महानगरपालिकेने बांधलेल्या निसर्गोपचार केंद्रात आतापर्यंत ३१ हजाराहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत. या निसर्गोपचार केंद्रात फक्त उपचारच नाही तर निसर्गोपचारक होण्यासाठी वर्ग चालविले जातात.नाशिक महानगरपालिकेने जयभवानीरोड जेतवन नर्सरीशेजारी २००१ मध्ये निसर्गोपचार केंद्राची इमारत बांधली. २००२ पासून योग चैतन्य साधना प्रतिष्ठानच्या वतीने निसर्गोपचार केंद्र चालविले जात आहे. या केंद्रात योग व निसर्गोपचार या दोन्ही पद्धतीचे उपचार केले जातात. तर महिन्याच्या १ ते १०, ११ ते २० व २१ ते ३० असे तीन निवासी शिबिरे घेतली जातात. उपचारासोबत केंद्रामध्ये निसर्गोपचाराचे एएनसी, एएमसी, एएमसीएनडी हे तीन कोर्स शिकविले जातात. यामध्ये महिन्याभराचा निवासी व पोस्टल वर्ग (अनिवासी) आहे. निसर्गोपचाराचे आतापर्यंत एक हजाराहून अधिक उपचारक या शिबिरात शिक्षण घेऊन तयार झाले असून, ते आपापल्या भागांत निसर्गोपचाराचे केंद्र चालवत आहे. तसेच योग संजीवन, योग सोपान, योग प्रवेश, योग परिचय, योग शिक्षा, योग प्रबोध, योग पंडित असे विविध योग प्रशिक्षण वर्ग वर्षभर सुरू असतात. निसर्गोपचाराचे महत्त्व व प्रचार वाढल्याने पूर्वीपेक्षा आता उपचारासाठी व प्रशिक्षण घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. या केंद्रात २७ बेड्स असून आजूबाजूला त्याच पद्धतीने वृक्षारोपण करून झाडे वाढविण्यात आली आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख प्रवीण देशपांडे, वैद्यकीय अधिकारी विद्या देशपांडे, व्यवस्थापक सुनील जाधव कार्यरत आहेत. तर केंद्रात १५ ते २० उपचारक रुग्णावर उपचार करत असतात. मनपाने उभारलेल्या निसर्गोपचार केंद्राला मिळणारा प्रतिसाद व गरजेनुसार तेथे आणखीन सोयी-सुविधा व इमारतीला रंगरंगोटी करण्याची गरज आहे.
निसर्गोपचाराकडे वाढता कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:14 AM