नाशिकरोड : विहितगावनाक्यावरील चौफुलीवर छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. तसेच सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी परिसरातील रहिवासी व वाहनधारकांनी केली आहे. विहितगावनाका चौफुली कॉर्नरवर सतत वाहतुकीची कोंडी होत असते. यामुळे लहान-मोठे अपघांत नित्याचेच झाले असून, गेल्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. विहितगाव नाका चौफुलीवर गतिरोधक नसल्याने वाहनधारक आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी वाहन चालवत निघून जाण्याचा प्रयत्न करतो. यामुळे वाहतुकीची कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मनपा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी विहितगावनाका चौफुलीवर गतिरोधक टाकावे. तसेच वाहतूक शाखेने सकाळी व सायंकाळी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवासी व वाहनधारकांनी केली आहे. विहितगावनाका लॅमरोड रस्त्यावर सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीची मोठी वर्दळ असते. तसेच विहितगाव नाका येथून वडनेर-पाथर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावरदेखील सतत वर्दळ सुरू असते. वडनेर-पाथर्डी रोडचे रूंदीकरण करण्यात आल्याने छोटी-मोठी व अवजड अनेक वाहने विहितगाव नाका, वडनेररोड, पाथर्डीरोडमार्गे नाशिक शहरात, अंबड, सातपूर, मुंबई-आग्रा महामार्गावरून इच्छितस्थळी जातात. या मार्गावर कुठेही सिग्नल नसल्याने व या मार्गे वाहतुकीची वर्दळ दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
विहितगाव नाका चौफुलीवर अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:32 AM