नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात सीएसआर उपक्रमांतर्गत ९ इन्क्युबेटर्स बसविण्यात आले असताना महापालिकेला मात्र, या उपक्रमातून मदत करायला कोणीही दाता पुढे आलेला नाही. त्यामुळे, महापालिकेने आयुक्तांच्या अधिकारात २३ इन्क्युबेटर्स खरेदीसाठी निविदाप्रक्रिया आरंभली असून, महिनाभरात मनपाच्या रुग्णालयांमध्ये नवीन इन्क्युबेटर्स बसण्याची शक्यता आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्क्युबेटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक नवजात अर्भकांवर उपचार करावे लागत असल्याने आॅगस्ट महिन्यात ५५ बालके दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सावध झालेल्या महापालिका आयुक्तांनीही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आणखी २३ इन्क्युबेटर्स बसविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.सद्यस्थितीत १७ इन्क्युबेटर्स असून, त्यात आणखी २३ इन्क्युबेटर्सची भर घालणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. सध्या महापालिकेच्या बिटको रुग्णालयात १०, कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ४, इंदिरा गांधी रुग्णालयात २, तर स्वामी समर्थ रुग्णालयात १ इन्क्युबेटर आहे. त्यात आणखी २३ इन्क्युबेटर्स वाढविण्यात येणार आहेत. त्यामध्ये बिटकोत ३, झाकीर हुसेन रुग्णालयात ४, इंदिरा गांधी रुग्णालयात ६, मोरवाडी येथील रुग्णालयात ६, मायको दवाखान्यात २, तर जिजामाता रुग्णालयात २ इन्क्युबेटर्सची संख्या वाढविली जाणार आहे. तीन आठवड्यांपूर्वी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबतचे आदेश वैद्यकीय विभागाला दिले होते. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर नवीन इन्क्युबेटर्स बसविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, सीएसआर उपक्रमांतून जिल्हा रुग्णालयाला नऊ इन्क्युबेटर्स मिळाले असून ते कार्यरतही झाले आहेत. जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच महापालिकेलाही सीएसआर उपक्रमांतून इन्क्युबेटर्स मिळण्याबाबत महापालिकेमार्फत विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातात. अनेक नामवंत कंपन्या, एजन्सी महापालिकेशी संबंधित आहे. शिवाय, अनेक बांधकाम व्यावसायिकांसह उद्योजकही महापालिकेशी संपर्कात असतात. सुमारे २० लाख रुपये किमतीच्या इन्क्युबेटर्ससाठी सीएसआर उपक्रमांतून कुणी पुढे यायला तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेला खरेदी प्रक्रियेतच अधिक रस असल्याची टीपणी त्यानिमित्ताने ऐकायला मिळत आहे.
‘सीएसआर’अंतर्गत मिळेनात इन्क्युबेटर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 12:02 AM