नाशिक : पंडीत जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रथमस्थानी असून ग्रामिण भागातही विविध घरकूल योजनांच्याद्वारे २१ हजार कुटुंबांना घरकूल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आगामी काळात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ३० हजार गोरगरीब कुटुंबांना हक्काचे घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केलेनाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय मुख्य शासकिय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महाजन प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाजन यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, योगेश घोलप, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, पोलीस अकादमीच्या संचालक अस्वती दोरजे, पोलीस अधिक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाजन म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण शिवार, उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियान, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदि माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. मागील दोन वर्षात ४४७ गावे जलसमृध्द झाल्याचा दावाही महाजन यांनी यावेळी केला. शेतकरी सन्मान योजनेतून १ लाख ४९ हजार शेतक-यांना ७९३ कोटी २९ लाखांचा लाभ दिला गेल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच त्यांनी मराठा समाजासाठी असलेल्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचाही आढावा घेत, मेरी येथे विद्यार्थी वसतीगृहासाठी दोन इमारतींच्या हस्तांतरणाला मंजुरी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान, मुलींचा जन्मदर वाढीसाठी आरोग्य विभागाकडून कौतुकास्पद प्रयत्न झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वन मंत्रालयाकडून राबविलेल्या वनमहोत्सवांतर्गत राज्यभरात १३ कोटी वृक्षलागवडीचे अभियान वनविभाग व सर्व शासकिय, निमशासकिय सरकारी यंत्रणांसह सामाजिक संघटनांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात सरकारला यश आल्याचे महाजन म्हणाले.दरम्यान, याप्रसंगी त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.