नाशिक : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार हेमंत गोडसे यांनी सुमारे तीन लाख मतांनी विजय मिळविला खरा परंतु त्यांना अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या होमपिचवर डोकेवर काढू दिले नाही. ९१ हजार मते मिळवणाऱ्या कोकाटे यांना विजय मिळाला नाही, परंतु विधानसभेची रंगीत तालीम मात्र त्यांनी करून घेतली.नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून, त्यातच सिन्नरचा समावेश होतो. सिन्नर मतदारसंघ हे कोकाटे यांचे होमपिच होय. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांना मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा होती. शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी त्यांना गोडसे यांना मतांची आघाडी मिळवून देण्याचा दिलेला शब्द पाळता आला नाही. सिन्नर मतदारसंघात १ लाख ९४ हजार ३१६ इतके म्हणजेच एकूण मतदार संख्येच्या तुलनेत ६४.९७ टक्के मतदान झाले होते. त्यात सिन्नर मतदारसंघात अपक्ष असूनही माणिकराव कोकाटे यांना ९१ हजार ११४ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना ५६ हजार ६७६ मते मिळाली. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार समीर भुजबळ यांना तर अवघी ३० हजार मते मिळाली. म्हणजेच गोडसे यांच्यापेक्षा ३४ हजार ३३६, तर भुजबळ यांच्यापेक्षा ६० हजार १७२ मते अधिक मते मिळाली आहेत.कोकाटे हे अपक्ष असतानादेखील त्यांनी १ लाख ३४ हजार २२९ मते मिळवली आहेत. अन्य मतदारसंघांमध्ये नाशिक पूर्वमध्ये ६६६६, नाशिक पश्चिममध्ये ६७१९, नाशिक मध्य मतदारसंघामध्ये ५९६४, देवळाली मतदारसंघात १०,०९६ आणि इगतपुरी मतदारसंघात १३ हजार ६७० मते मिळाली आहेत.
अपक्ष कोकाटेंना सिन्नरमध्ये गोडसेंपेक्षा अधिक मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 1:18 AM