सटाणा : शहरातील प्रभाग ७ मध्ये भाजपाच्या उमेदवारांना अपक्ष युवा उमेदवारांशी कडवी झुंज द्यावी लागत आहे. विविध पक्षांकडून तिकीट कापल्यामुळे काही उमेदवारांना ऐनवेळी पुरस्कृतचे बाशिंग बांधून बोहल्यावर चढविले आहे. भाजपा व आघाडीच्या उमेदवारांविरुद्ध पुरस्कृत उमेदवारांनी दंड थोपटले असले तरी ओबीसी कार्ड आणि मराठा कार्ड या जात फॅक्टरमुळे येथील लढत रंगतदार ठरत आहे.
शहरातील प्रभाग ७ मध्ये माळी आणि मराठा समाजाचे प्राबल्य आहे. असे असले तरी बाराबलुतेदारांचे या प्रभागात निर्णायक मतदान आहे. येथे ओबीसी महिला व खुला प्रवर्ग या दोन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. खुल्या जागेवर भाजपाकडून जिभाऊ विष्णू सोनवणे, आघाडीकडून भद्रा ग्रुपचे राकेश चंद्रकात खैरनार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पुरस्कृत शिवमुद्रा ग्रुपचे चेतन अशोक मोरे, आघाडीकडून भद्रा ग्रुपचे राकेश चंद्रकात खैरनार, कॉँग्रेसचे पुरस्कृत राजे संग्राम, शिवसेनेचे पुरस्कृत जितेंद्र रौंदळ अशी पंचरंगी लढत होत आहे. ओबीसी महिला राखीव जागेवर भाजपाकडून कासूबाई गुलाबराव पगार, राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत स्मिता सुनील खैरनार, आघाडीकडून भारती सुभाष सूर्यवंशी यांच्यात तिरंगी सामना होत आहे. गेल्या निवडणुकीत कासूबाई पगार यांचे पुत्र नंदकुमार पराभूत झाले होते. या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन पालिका गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. स्मिता खैरनार यादेखील बॅट निशाणी घेऊन प्रथमच मैदानात उतरल्या आहेत. ओबीसी कार्डच्या भिस्तीवर सामना जिंकण्यासाठी किती रण काढतात याकडे लक्ष लागून आहे. आघाडीच्या भारती सूर्यवंशी यांचा गेल्या निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. त्यदेखील सहानुभूतीच्या लाटेवर स्वार झाल्या आहेत. एकंदरीत या लढाईत ओबीसी कार्ड चालते की सहानुभूतीची लाट कोणाला तारते याकडे लक्ष लागून आहे.