नाशिक : चीनला विरोध करणारा, टक्कर देणारा एकमेव म्हणून भारत देश ओळखला जात आहे. त्यामुळे इस्लामी राष्ट्रांसह इतर छोट्या देशांनाही भारताबाबत आश्वासकता वाटत असून, ते देश भारताच्या बाजूने सक्षमपणे उभे राहत असल्याचे प्रतिपादन संरक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांनी केले.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बा.शि. मुंजे यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त रावसाहेब थोरात सभागृहात सुरू असलेल्या डॉ. मुंजे स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प संरक्षणविषयकतज्ज्ञ नितीन गोखले यांनी गुंफले. जीओपॉलिटिक्स इन २०३०-इंडो पॅसिफिक हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे अध्यक्षस्थानी होते. गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रणजित सिंग आनंद हे प्रमुख पाहुणे होते. प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून मालेचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरावणे, सहकार्यवाह नितीन गर्गे यांच्यासह इतर मान्यंवर उपस्थित होते.
इंडो पॅसिफिकमध्ये भारत इतरांच्या तुलनेत अधिक प्रभावी होण्यासाठी आपल्याला सैनिकीकरण, आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या वीस वर्षांत भारताचे महत्त्व वाढले असून, अमेरिका भारताला वेगवेगळ्या प्रकारे पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहे, सर्व मदत भारताला देण्यास ते तत्पर असून चीनविरुद्ध आमच्या बाजूने राहा, असा अमेरिकेचा आग्रह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर ‘लूक इस्ट’ऐवजी ‘ॲक्ट इस्ट’ पॉलिसी अमलात आणली असून, त्यात फायदा होऊ लागला आहे. हा बदल झाला असून, यूएईमध्ये भारताला जेवढे स्थान, मान आहे तेवढा अमेरिकेलासुद्धा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. संस्थेचे नाशिक विभाग खजिनदार शीतल देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. आरती शिरवाडकर यांनी सूत्रसंचालन केले.
भारताचा आत्मविश्वास बळावला
चीनविरोधात जेव्हा उभे राहायची वेळ येते, तेव्हा भारत त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून सक्षमपणे उभे राहू शकतो. चीनला परतवून लावल्याने भारतीय सैन्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. २०१६ उरी आणि २०१९ बालाकोटमधील हल्ल्यांना ज्या पद्धतीने तोडीस तोड उत्तर दिल्याने भारताचे स्थान उंचावले आहे. चीनने स्वतःला सक्षम बनविले असून, अमेरिकेसह इतर देशही त्यांच्या जवळपासही सध्या दिसत नाही. चीनने इतर छोट्या देशांना कर्जबाजारी करून अनेक छोट्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या ताब्यात घेतले आहे. स्वाभाविकच कर्जपरतफेड न करता आल्याने त्यांची गोची झाली आहे. या सर्व देशांना आपलेसे करणे किंवा त्यांची सहानुभूती मदत मिळविण्यासाठी आपल्याकडे ओढणे हे भारतापुढील मोठे आव्हान असेल. पाकिस्तानला मदत करण्यास चीन नेहमी तत्पर असून, भारताविरोधात चीन व पाकिस्तान मिळून सतत कारवाया करीतच राहणार असल्याने सदैव दक्षता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.