नाशिक : ‘मोदी सरकार होश में आओ,’ ‘बेटी बचेगी तो पढेगी..,’ ‘ इज्जत के लुटेरे अब भी जिंदा हैं, भारत शर्मिंदा हैं’, ‘वुई वॉन्ट जस्टिस’, ‘फांसी दो, फांसी दो’ अशा विविध घोषवाक्यांचे फलक झळकवित व जोरदार घोषणाबाजी करत जुने नाशिक परिसरातून बुधवारी (दि. १८) संध्याकाळी कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी मुस्लीम महिला, पुरुष व तरुणांचा लक्षणीय सहभाग होता.जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये आठवर्षीय चिमुरडीवर आठ दिवस पाशवी बलात्कार करून नंतर तिची अमानुषपणे हत्या करणाऱ्या त्या सर्व नराधमांना तसेच उन्नाव बलात्काराच्या घटनेतील संशयित राजकीय आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी व सदर गुन्ह्यांचा खटला जलद न्यायालयात चालविला जावा, या मागणीसाठी जुने नाशिकमधील सर्वपक्षीय नगरसेवकांसह मुस्लीम महिला, तरुण, तरुणी रस्त्यावर उतरल्या.
नगरसेवक समीना मेमन, वत्सला खैरे, हेमलता पाटील, आशा तडवी, नयना गांगुर्डे, राहुल दिवे, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, आकाश छाजेड, शोएब मेमन यांच्यासह मुस्लीम महिलांनी हातावर काळ्या फिती बांधून मेणबत्ती प्रज्वलित करत फुले मंडई ते शालिमार येथील आंबेडकर पुतळ्यापर्यंत संचलन केले. यावेळी सहभागी नागरिकांनी भाजपा सरकारचा निषेध करत या भारतासारख्या संस्कृतीप्रधान देशात घडणा-या बलात्काराच्या घटना तत्काळ थांबवाव्या, या घटनांमधील संशयितांविरुद्ध जलदगतीने खटला चालविला जावा, अशी मागणी करण्यात आली.