अझहर शेख
नाशिक : भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या व युद्धात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याला दोन अत्याधुनिक विदेशी तोफा शुक्रवारी (9 नोव्हेंबर) नाशिक मधील देवळालीच्या केंद्रात दिमाखदार लष्करी सोहळ्यात हस्तांतरित करण्यात आल्या.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत उपस्थित होते.
देवळाली तोफखाना केंद्राच्या गोळीबार मैदानावर चित्तथरारक तोफांच्या बॉम्बहल्ल्याच्या प्रात्यक्षिकाच्या साक्षीने लष्करी थाटात होवित्झर व वज्र या आधुनिक तोफांचे हस्तांतरण करण्यात आले. पाकिस्तान, चीनसारख्या शत्रू राष्ट्रांशी दोन हात करण्यासाठी दोन अत्याधुनिक तोफा भारतीय सैन्यदलात दाखल झाल्या आहेत यामुळे शत्रूंचे धाबे दणाणले आहेत. बोफोर्सनंतर भारतीय तोफखान्यात पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या तोफा दाखल झाल्याने सैन्याची ताकद अन जवानांचे मनोबल वाढले आहे.
उंच पर्वतीय प्रदेशातीळ भारतीय सीमांचे संरक्षण करण्यासाठी सैन्याला प्रयत्नांची पराकाष्ठा लागत होती. 1977 साली पाकिस्तान सोबतच्या युद्धानंतर भारतीय तोफखान्यात बोफोर्स दाखल झाली. मात्र भ्रष्टाचारच्या वादाच्याच्या भोवऱ्यात बोफोर्स अडकली. त्यानंतर तोफांची खरेदीच थांबवण्यात आली. अखेर तब्ब्ल 30 ते 35 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘के-९ वज्र’ आणि अति उंच पर्वतीय क्षेत्रात वापरता येतील, अशा हलक्या वजनाच्या होवित्झर सारख्या तोफाच्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला. भारतीय तोफखाना दलाकडे वेगवेगळ्या अंतरांवर मारा करणाऱ्या तोफा आहेत. जुनाट तोफांचे बॅरल आणि सुटे भाग उपलब्ध होत नसल्याने त्यांची देखभाल दुरुस्ती जिकिरीची ठरली आहे. विद्यमान सरकारने दक्षिण कोरियन बनावटीच्या के-९ वज्र – टी १०० तोफा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० तोफा दक्षिण कोरियातून घेऊन उर्वरित ९० तोफांची देशात निर्मिती करण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
यावेळी देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केंद्र सरकारच्या थेट धोरणांमुळे देशाच्या लष्करात तीन अत्याधुनिक शस्त्र दाखल झाल्याचं स्पष्ट केलं. या नवीन तोफांमुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे असं देखील सीतारामन म्हणाल्या. मेक इन इंडिया संकल्पनेतून येणाऱ्या काळात के -9 वज्र तसेच एम 777 ची निर्मिती करणार असल्याचं देखील सीतारामन यांनी स्पष्ट केलं. संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये देश वेगवान वाटचाल करत आहे असं त्या म्हणाल्या. चार वर्षात सरकारने कमी वेळात काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच 2006 पासून या तोफांच्या खरेदीसाठी प्रयत्न सूरू होते. मात्र आमच्या सरकारच्या काळात ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण झाल्याने त्याचा अभिमान वाटतो, असे सीतारामन माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. गेल्या 30 वर्षांतील लष्करात जे बदल व्हायला हवं होतं ते फक्त मागील 4 वर्षात आम्ही केल्याचा दावा ही त्यांनी केला. विशेष म्हणजे या तोफा मेड इन इंडिया अंतर्गत भारतात बनवल्या जाणार आहे. त्यामुळे संरक्षण सामग्री निर्मितीत भारत स्वयंसिद्ध भविष्यात होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.