लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारतीय ब्रिज संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी टी. के. बॅनर्जी यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सर्व पदांसाठी उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून, त्यात नाशिकच्या हेमंत पांडे यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे.
या सर्व पदांसाठी जेवढ्या जागा निवडून द्यायच्या होत्या, तेवढेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी २६ डिसेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत भारतीय ब्रिज संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. पांडे हे नाशिकच्या मित्र विहार क्लबचे खेळाडू असून, त्यांनी जिल्हा व राज्य ब्रिज संघटनेच्या विविध पदांवर काम केले आहे. सध्याच्या भारतीय ब्रिज संघटनेच्या सहसचिव पदावर ते काम करत असून, आता त्यांनी खजिनदार पदावर झेप घेतली आहे. बिनविरोध निवड झालेले संघटनेचे इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत. अध्यक्षपदी एस. सुदर्शन, उपाध्यक्षपदी किशन गोयल, मनीष बहुगुणा, सार्थक भेरुया, दीनबंधू चौधरी, आनंद सामंत, अर्जित गुहा, सचिवपदी चंद्रकांत कुलकर्णी, खजिनदारपदी हेमंत पांडे, सहसचिवपदी त्रिभुवन पंत, मोनिका जाजू यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ब्रिजप्रेमींकडून कौतुक होत आहे.