वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेवरील कर्जाचा डोंगर गेल्या दोन दशकांमध्ये वाढत असून अमेरिकेच्या डोक्यावर भारताचेही २१६ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. अमेरिकेच्या खासदाराने चर्चेमध्ये ही माहिती दिली असून वाढत्या कर्जाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिकेचे खासदार एलेक्स मुनी यांनी सभागृहातील चर्चेमध्ये देशावरील वाढत्या कर्जाबाबत चिंता व्यक्त केली आहे. सन २०२० मध्ये अमेरिकेवरील कर्ज २३,४०० अब्ज डॉलर होते. ते आता वाढून २९००० अब्ज डॉलर झाले आहे. याचाच अर्थ प्रत्येक अमेरिकन व्यक्तीच्या डोक्यावर ७२,३०९ डॉलरचे कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेवर भारताचेही २१६ अब्ज डॉलरचे कर्ज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ब्राझीलनेही जगातील पहिल्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या देशाला २५८ अब्ज डॉलरचे कर्ज दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेवर चीन आणि जपान या प्रतिस्पर्धी देशांचे सर्वाधिक कर्ज असल्याचे दिसून येत आहे. चीन आणि जपानने अमेरिकेला प्रत्येकी १००० अब्ज डॉलरचे कर्ज दिलेले आहे. चीनकडून मिळालेले कर्ज हे अमेरिकावरील कृपा नसून संकट असल्याकडे मुनी यांनी लक्ष वेधले. चीन हा अमेरिकेचा शत्रू असल्याने या कर्जाचा वापर अमेरिकेच्या विरोधात होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळापासून अमेरिकेवरील कर्ज वाढत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये कर्जामध्ये मोठी वाढ झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला खीळ लागत असल्याची बाबही खासदारांनी स्पष्ट केली. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नुकतेच १९०० अब्ज डॉलरचे कोविड पॅकेज जाहीर केले आहे. यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.