मालेगाव: मनमाड-मालेगाव इंदोर रेल्वेमार्गाचे प्रलंबित पडलेले काम आता पुन्हा वेगात सुरू होत असून आगामी सात वर्षात रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. मनमाड-इंदोर रेल्वेमागार्चे १० हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आता पोर्ट कनेक्टीव्हीटी कॉर्पोरेशनऐवजी दुसऱ्या कंपनीला देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
रेल्वेतील जाणकारांच्या मते नवीन कंपनी स्वत: भांडवल उभे करेल. सर्व काही सुरळीतरित्या जमून आल्यास येत्या पाच ते सात वर्षात नवीन रेल्वे लाईन टाकली जाईल. याचा जास्तीत जास्त फायदा जसा इंदोरकरांना होईल तसाच मालेगावच्या यंत्रमाग व्यावसायिकांना देखील होणार आहे. रेल्वे पॅसेंजर एमीनीटीज समितीचे पूर्व सदस्य नागेश नामजोशी यांच्या मते मनमाड- इंदोर रेल्वेमार्गाचे काम आता नवीन एजन्सीला देण्याचा विचार रेल्वे करीत आहे. नवीन एजन्सी स्वत: फंड उभा करेल. रेल्वे कॉर्पोरेशनच्या जागी आता महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला मनमाड- इंदोर रेल्वेमार्गाचे काम दिले जाऊ शकते. नवीन रेल्वे मार्गामुळे इंदोर- मुंबईचे अंतर १७० किमीने कमी होईल.. मनमाडहून नाशिकमार्गे त्यामुळे इंदोरपर्यंतचा प्रवास केवळ नऊ तासांचा असेल. ही रेल्वे मुंबईला पोहोचेल.
२१ वर्षांचा संघर्ष
मनमाड-मालेगाव इंदोर रेल्वमार्ग ३६२ किमीचा आहे. सुमारे १० हजार कोटी रुपये यावर खर्च होणार आहेत. १२ वर्ष मनमाड- मालेगाव्न इंदोर रेल्वे मार्गासाठी संघर्ष सुरू आहे. २०१८ मध्ये एमओयू झाला होता. त्याचवर्षी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये काम सुरू होणार होते. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टना ५५ टक्के , मध्यप्रदेश सरकारने १५ आणि महाराष्ट्र सरकारने १५ टक्के रक्कम देण्याचे ठरले होते. मनमाड-इंदोर रेल्वेमार्ग संघर्ष समितीचे सदस्य मनोज मराठे यांच्यामते आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण व्हायला हवे होते, परंतु ते झाले नाही. आता नवीन एजन्सीमार्फत काम वेळेत पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.