नाशिक - महापालिकेने मिळकत करांमध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ करत नाशिककरांना दणका दिल्यानंतर आता पाणीपट्टी दरातही वाढ करण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. प्रामुख्याने, महावितरण कंपनीच्या धर्तीवर टेलिस्कोपी पद्धतीने पाणीपट्टीची आकारणी केली जाण्याची शक्यता असून त्यामुळे पाण्याच्या अनिर्बंध वापराला चाप बसू शकतो.मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत मिळकत करांमध्ये भाडेमूल्यावर आधारित दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. या करवाढीस विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे. महासभेत प्रशासनाकडून पाणीपुरवठा दरात वाढ करण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सदरचा प्रस्ताव मात्र, प्रशासनाकडून त्यात सुधारणा करण्यासाठी मागे घेण्यात आला होता. संबंधित प्रस्ताव माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी ठेवलेला होता. त्यात, पंचवार्षिक वाढ प्रस्तावित करत दरवर्षी प्रत्येकी एक रुपया वाढ सुचविण्यात आली होती. सद्यस्थितीत, घरगुती वापरासाठी पाच रुपये प्रती हजार लिटर, बिगर घरगुतीसाठी २२ रुपये प्रती हजार लिटर तर औद्योगिक वापरासाठी २७ रुपये प्रती हजार लिटर याप्रमाणे दर आकारणी केली जाते. कृष्ण यांनी घरगुतीसाठी पहिल्या वर्षी ७ रुपये, बिगरघरगुतीसाठी २५ रुपये तर औद्योगिकसाठी ३० रुपये दर प्रस्तावित केले होते. त्यानंतर, त्यात दरवर्षी प्रत्येकी एक रूपयांनी वाढ सुचविण्यात आलेली होती. दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मिळकत कराचा सुधारित प्रस्ताव महासभेत ठेवला आणि त्याला मंजुरीही घेतली. मात्र, पाणीपट्टीत सुधारणा करण्यासाठी संबंधित प्रस्ताव मागे घेतला. आता, पाणीपट्टी दरात सुधारणा करण्याची तयारी सुरू असून महावितरणच्या धर्तीवर ज्या पद्धतीने वीजेची बिल आकारणी केली जाते, त्यानुसार टेलिस्कोपी पद्धतीने महापालिकेनेही पाण्याचा ठराविक मर्यादेनंतर होणा-या वापरानुसार बिल आकारणीचा विचार सुरू आहे.
नाशकात घरपट्टीपाठोपाठ पाणीपट्टीतही दरवाढीचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 3:42 PM
महापालिका : महावितरणच्या धर्तीवर टेलिस्कोपी पद्धतीने आकारणी शक्य
ठळक मुद्देसद्यस्थितीत, घरगुती वापरासाठी पाच रुपये प्रती हजार लिटर, बिगर घरगुतीसाठी २२ रुपये प्रती हजार लिटर तर औद्योगिक वापरासाठी २७ रुपये प्रती हजार लिटर याप्रमाणे दर आकारणीपाण्याचा ठराविक मर्यादेनंतर होणा-या वापरानुसार बिल आकारणीचा विचार सुरू