आठवणीतील निवडणूक
व र्ष होते १९७२. विधानसभेच्या निवडणुका. लाट इंदिरा कॉँग्रेसची. मी नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघातील कॉँग्रेस आयचा उमेदवार. निफाड मतदारसंघात पालखेड मिरचीचे गाव. तेथील मतदान केंद्रावर एक आंधळी म्हातारी मतदानासाठी आली. वाट दाखविण्यासाठी सोबत तिचा नातू होता. आंधळ्या व्यक्तींना मतदान करण्यासाठी निवडणूक केंद्र अधिकाऱ्याने मदत करावी, असा नियमच आहे. केंद्रप्रमुखाने विचारले आजी मत कुणाला द्यायचं? आजीचे उत्तर , ‘इंदिरा गांधीला’. ‘आजी इथे इंदिरा गांधी उमेदवार नाहीत.’ ‘मग मला मत द्यायचं नाही, मी चालले.’ केंद्रप्रमुख चलाख होते, आजींची इच्छा त्यांच्या लक्षात आली. ते म्हणाले ‘आजी इंदिरा गांधींची निशाणी तुम्हाला माहिती आहे का? आजी म्हणाली ‘हो. इंदिराबार्इंची निशाणी आहे, गाय-वासरू.’ केंद्रप्रमुख म्हणाले येथे गाय-वासरू आहे, काय करू? आजी म्हणाली ‘गाय-वासरावर शिक्का मार.’ त्यावेळी व्होटिंग मशीन्स नव्हत्या, शिक्का मारावा लागे.आता वर्ष यंदाच्या लोकसभेचे. निवडणुका लोकसभेच्या. लाट मोदींची. मतदारसंघ दिंडोरी. नांदगाव तालुक्यातील बाणगावचे मतदानकेंद्र. एक अंध म्हातारी नातवाला घेऊन मतदानकेंद्रावर आली. केंद्रप्रमुखाने विचारले ‘आजी कुणाला मत देऊ?’ आजीबाई म्हणाल्या ‘कमळाला’. अधिकारी स्वत:च्या जागेवरून उठला. व्होटिंग मशीनजवळ आला व कमळाचे चिन्ह शोधण्यासाठी थोडे खालीवर बघू लागला. ती त्याला म्हणाली ‘ए खालीवर काय पाहतोस ? नीट कमळ दाब, तुला काय वाटलं ? मी भीत (पूर्ण) आंधळी आहे काय ? मला थोडं थोडं दिसतंय.’ दोन्ही वयस्कर आणि अशिक्षित महिला. दोघींचाही निर्धार पक्का. कुणाला मत द्यायचे त्याचा. जेव्हा भारतीय मतदार एका निर्णयावर येतो, तेव्हा ती त्याची इच्छा असते. आपण तिला लाट म्हणतो. विविध निवडणुकांच्या वेळी अशा वेगवेगळ्या लाटा आल्याचे आपण अनुभवले आहे. या सर्व यशापयशाचे कारण ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, सोशल मीडियाचा वाढता वापर किंवा कांद्या बटाट्याचे भाव नव्हेत. या सर्वांचे श्रेय जाते, ते फक्त भारतीय मतदारांच्या सामूहिक शहाणपणाला.विनायकदादा पाटील