इंदिरानगर : नेहमी पालापाचोळा आणि लहान-मोठे जाहिरातींचे फलक असणाऱ्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकचे चित्र सध्या पूर्णपणे बदलून गेले आहे.आयुक्त तुकाराम मुंढे येत्या शनिवारी (दि. १२) ‘वॉक विथ कमिशनर’ हा कार्यक्र म राबविणार असून, त्यासाठी ही सज्जता बघून ट्रॅकवर नियमित येणाया नागरिकांना सुखद धक्का बसला आहे. आयुक्त येणार म्हणून जर अशी साफसफाई होणार असेल तर आयुक्तांनी येथे नियमित वॉक करावा, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. इंदिरानगर येथील मुंबई महामार्ग ते साईनाथनगर चौफुलीपर्यंत असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर सुचितानगर, विनयनगर, इंदिरानगर यांसह परिसरातील शेकडोच्या संख्येने आबालवृद्ध सकाळी आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येतात. ट्रॅकवर असलेला पालापाचोळा आणि लगत असलेल्या निलगिरी बागेत मोठ्या प्रमाणात गाजर गवत तसेच खाद्यपदार्थांचे पाऊच, कचरा असे चित्र नियमित बघायला मिळते. वारंवार तक्र ार करूनही नियमित न होणारी स्वच्छता आणि लगतच असलेल्या शौचालयाची दुरवस्था त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अखेर आयुक्त येणार असल्याने जॉगिंग ट्रॅक आणि समोरील परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.
इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:06 AM