दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे येथे जेवणातून विषबाधा होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, एकाला अत्यवस्थ असल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिंडोरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील इंदोरे येथील चंद्रकांत दरगोडे यांचा पोल्ट्री फार्म आहे. इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथील चंद्रकांत खरोटे, राहुल हरिश्चंद्र नाठे व नाशिक येथील शशिकांत चंद्रकांत जाधव यांनी तो भाड्याने घेतले आहे. तेथे ते कुकुटपालन व्यवसाय करतात. सदर पोल्ट्री फार्मशेजारील फार्म दिंडोरी येथील शैलेश सुरेश शिंदे यांनी चालविण्यास घेतला आहे. गुरुवारी रात्री चंद्रकांत वसंत खरोटे (२७), शशिकांत चंद्रकांत जाधव (३०) हे दोघे नाशिकहून पोल्ट्रीवर घरून जेवणाचा डबा घेऊन आले होते. त्यांनी सोबत आणलेले मद्य प्राशन करत जेवण केले, तर शैलेश शिंदे हाही त्यांच्याकडे जेवणासाठी आला होता. जेवणानंतर ते रात्री साडेअकाराच्या सुमारास झोपल्यानंतर त्यांना पहाटेच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यातच शैलेश शिंदे व चंद्रकांत खरोटे यांचा जागीच मृत्यू झाला तर शशिकांत जाधव अत्यवस्थ स्थितीत होता. त्याच्या कमरेखालील शरीर जड पडून त्याला दरवाजा उघडता न आल्याने तो तडफडत राहिला. सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा सहकारी राहुल हरिश्चंद्र नाठे याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा दोघे मृतावस्थेत तर जाधव अत्यवस्थ स्थितीत आढळून आला. दरम्यान, नाठे याने घटनेचे गांभीर्य ओळखत तत्काळ दिंडोरी पोलीस ठाण्यात माहिती दिली व जाधव यास उपचारासाठी तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. अधिक उपचारासाठी जाधवला जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. दिंडोरी येथील शैलेश शिंदे याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. शिंदे हा मनसेचा धडाडीचा कार्यकर्ता होता. शिंदेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिंडोरी पोलिसांनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस निरीक्षक संजय शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली अय्युब शेख, हवालदार सौंदाणे तपास करीत आहे. (वार्ताहर)
इंदोरेत विषबाधेने दोघांचा मृत्यू
By admin | Published: December 19, 2014 11:01 PM