नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुºहेगाव येथे कृषी विभागाच्या मदतीने दारणामाई फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी स्थापन झाली, परंतु देशभरात जीवघेण्या कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे भात उत्पादन मालाला उठाव नसल्यामुळे सदर इंद्रायणी प्रकारचा तांदूळ कंपनीतच पडून होता. अशा बिकट परिस्थितीत कंपनी सापडलेली असताना आणि त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांनी जळगाव येथे संपर्ककरून इंद्रायणी तांदळाची सुमारे १० टन आॅर्डर जळगाव जिल्ह्यात मिळवून दिली आणि कंपनीला परिणामी शेतकऱ्यांना मोठा दिलासा लाभला.कृषी अधिकारी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांच्या कंपनीला चक्क पंधरा लाख रुपये किमतीच्या तांदळाची आॅर्डर मिळाली. कंपनीला मिळालेल्या आॅर्डरपैकी दहा टन तांदळाने भरलेला पहिला ट्रक इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे व्हाइस चेअरमन संदीप गुळवे, तसेच कंपनीचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावला रवाना करण्यात आला. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी शिंदे, कृषी पर्यवेक्षक चंद्रशेखर अकोले, कृषी सहाय्यक विनोद सांगळे, कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब त्र्यंबक धोंगडे, तसेच कंपनीचे संचालक मंडळ, सरपंच भाऊसाहेब धोंगडे, जगन भीमा धोंगडे, हरिभाऊ गतीर, विश्वास धोंगडे, बाबूराव धोंगडे, भगवान दगडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
इगतपुरीच्या इंद्रायणीला मिळाली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 10:04 PM