इगतपुरी : निसर्ग संपदा भरभरून लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली परिसर इंद्रपुरी म्हणून विकसित व्हावा, यासाठी पर्यटन खाते कार्यरत आहे. सामूहिक प्रयत्नांनी भावली भागाचा कायापालट करण्यात येऊन हॉलिडे व्हिलेज म्हणून भावली परिसर विकसित करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील भावली धरण भागात मंगळवारी पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शेकडो उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. इगतपुरी येथील महिंद्रा कंपनी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, इगतपुरी सिटिझन्स फोरम यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या सहभागातून या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले, इगतपुरी सिटिझन्स फोरम, व महिंद्रा यांच्या सहकार्याने पर्यटन विभाग भावली भागात इंद्रपुरी उभी करणार आहे. भावली भागात उपयुक्त वृक्ष लावून इगतपुरी सिटिझन्स फोरमच्या युवकांकडून संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे आशुतोष राठोड, समृद्धी महामार्ग उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे, जलसंपदा कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, प्रमोद कुलकर्णी, महिंद्रा इगतपुरीचे विजय कालरा, हिरामण आहेर आदी उपस्थित होते. आगामी काळात भावली परिसरात फिरती स्वच्छता गृह त्याचबरोबर ठिकठिकाणी चेंजिग रूम केल्या जातील. पर्यटनाला कृषीची जोड देऊन कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांसाठी रोजगारनिर्मिती केली जाईल. बोटिंग क्लब, वेलनेस सेंटर, रोप वे, पॅरोसिलिंग ,पॅराग्लायडिंग यासारख्या सुविधा देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील, असे अश्वासन पर्यटनमंत्री रावल यांनी यावेळी दिले.
भावली भागात इंद्रपुरी उभी करणार - जयकुमार रावल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 1:47 AM