सातपूर : जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधिंताची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात १२ ते २३ मेपर्यंत लागू असलेला कडक लॉकडाऊन रविवारी (दि.२३) मध्यरात्री १२ वाजेनंतर शिथिल करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योग कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अटींसह सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आल्याने सोमवार (दि.२४) जिल्ह्यातील उद्योगांची चाके पुन्हा गतिमान होणार आहेत.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या बारा दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर सोमवार (दि.२४) पासून उद्योगांची चाके पुन्हा एकदा फिरू लागणार असून कोविड-१९ चे सर्व नियम पाळून कामगारांनी आपापल्या पाळीत कामावर हजर राहण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापनाकडून दिल्या जात आहेत. कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीने दि.१२ ते २२ मे दरम्यान लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यापार, व्यवसाय आणि उद्योग ठप्प झाले होते. लॉकडाऊनमध्ये मेडिकल दुकाने, दवाखाने, अन्न प्रक्रिया आणि फर्मास्युटिकल उद्योगांसह अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या होत्या. शिवाय ज्या उद्योजकांना उद्योग सुरू ठेवायचे असतील त्यांनी कारखान्यात अथवा दोन किलोमीटर अंतरावर कामगारांच्या निवासाची आणि येण्या-जण्याची सोय केल्यास त्यांना उद्योग सुरू ठेवता येईल, असे स्पष्ट आदेश बजावण्यात आलेले होते. त्यानुसार महिंद्रा अँड महिंद्रा, टीडीके इपकोस, पांचाल इंजिनिअर्स यासह बहुतांश कारखान्यांनी या निर्देशाचे पालन करीत उत्पादन सुरू ठेवले होते. तर अन्न प्रक्रिया आणि फर्मास्युटिकल आणि अत्यावश्यक सेवेतील उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू होते. आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना जिल्ह्यातील उद्योग पुन्हा पूर्ववत सुरू होऊ शकरणार आहे.
आजपासून जिल्ह्यातील उद्योग पूर्ववत
- नाशिक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे असे १२ हजार ८०० उद्योग आहेत. त्यापैकी ३४५१ (२५ टक्के) उद्योग आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्देशानुसार सुरू होते. मात्र, रविवारी (दि.२३) मध्यरात्री १२ वाजेनंतर लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर सोमवारपासून कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून उद्योग सुरू करण्यास जिल्हा व्यवस्थापनाने परवानगी दिल्याने बहुतांश सर्वच उद्योग सुरू होऊ शकणार आहेत.
- सुरुवातीला उद्योगांनी हमीपत्र द्यावे, अशी अट घालण्यात आली होती; परंतु औद्योगिक संघटना आणि उद्योजकांनी हरकत घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही अट शिथिल केली आहे. त्यामुळे आता उद्योग पूर्ववत सुरू करण्यास कोणतीही अडचण राहिलेली नसल्याने सोमवारपासून उद्योगांची चाके पुन्हा गतिमान होणार आहेत. त्यादृष्टीने वेगवेगळ्या कंपनी व्यवस्थापनांकडून कामगारांना सूचित करून आपापल्या शिफ्टमध्ये कामावर येण्यास सांगितले जात आहे.