नाशिक : ब्रह्मगिरी बचावासाठीची मोहीम तीव्र झालेली असताना आणि त्यासाठी टास्क फोर्स तसेच वनविभागाची समिती देखरेख करीत असतानाही प्रशासकीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून पहिने परिसरात विकासकामाच्या नावाखाली घुबड दरी ही नदीच बुजविण्यात आल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. मात्र सुरू असलेली कामे अधिकृत की अनधिकृत याबाबत परस्पर विरोधी दावे केले जात आहेत. विशेष म्हणजे या परिसरात आखाड्यांच्या जागा असल्याने पर्यावरण रक्षणार्थ असलेल्या सोशल मीडियावर रविवारी याविषयी मोठे वादळ उठले होते.
त्र्यंबकेश्वरला नुकत्याच झालेल्या पावसामुळे भराव वाहून गेल्यानंनंतर घुबड दरी नदी असल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्रह्मगिरीच्या डोंगर कुशीतून वाहणारी नदी पहिने मार्गातच बंदिस्त करण्यात आली असून, त्यावर भराव टाकण्यात आलेला होता. आता पावसामुळे त्यावरील खडी, दगड बाजूला झाल्यानंतर नदीचा प्रवाह पुन्हा सुरू झाला असता हा सारा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला आहे. आता पाऊस थांबल्याने पुन्हा नदीवर भराव टाकण्याचे काम सुरू झाल्याचे बोलले जात आहे. नदीवर सिमेंटच्या मोऱ्या टाकून नदी अंडरग्राउंड करण्याचे आणि त्यावर भराव टाकला जात असल्याने नेमके हे काम कोणत्या विकासयंत्रणेचे आहे याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण मिळणे अपेक्षित आहे. मात्र याविषयी संबंधितांना जाब विचारूनही उत्तरे मिळत नसल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.
त्र्यंबकेश्वरचा मोठा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर झालेला असताना ब्रह्मगिरीच्या परिसरात अवैध उत्खनन होत असल्याचा मुद्दा तापलेला असतानाच पहिने परिसरातील भीममाळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कामांबाबत ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेत अवैध काम सुरू असल्याचा दावा केला आहे. ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत तेथील जागांचे अधिकार, आखाड्यांची जागा आणि कूळ अधिकाराबाबत वाद कायम असताना कामे सुरू असल्याने या कामांबाबत प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
--इन्फो--
आखाड्यांच्या जागेचा प्रश्न
पहिने येथे निर्मल आणि नया उदासी आखाड्यांची सुमारे ६०० एकर जागा असल्याचे सांगितले जाते. सध्या देशात आखाड्यांच्या मालमत्तेवरून मोठे वादळ उठले असताना त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांच्या जागांची मालकी आणि त्यावरील कूळ अधिकार, हक्कसोड याविषयीच्या कागदपत्रांमध्ये मोठा घोळ असल्याने याप्रकरणाची चौकशी होण्याची मागणी होत आहे.
--कोट--
ब्रह्मगिरी बचावासाठी एकीकडे आंदोलन सुरू असताना पहिनेत खोदकाम होत आहे. पहिने परिसरातील बांधकाम अधिकृत की अनधिकृत याबाबतची चौकशी होणे अपेक्षित आहेच. शिवाय पर्यावरणाला हानीकारक असे कामकाज होऊन स्थानिक विस्थापित होत असतील तर शासनानेच या प्रकरणाची चौकशी करून सत्य उघडकीस आणावे
- भाऊसाहेब आंबापुरे, पीडित ग्रामस्थ
(फोटो)