नाशिक : गेल्या महिनााभरापासून बंद असलेले उद्योग सुरु करण्यासाठी असलेले निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी शिथील केले असून त्यामुळे बाधीत रूग्णांच्या घराच्या परीसरातील झोन वगळता नाशिक शहरातील उद्योग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता किमान येत्या एक ते दोन दिवसात परवानगीचे सोपस्कार पुर्ण झाल्यानंतर उद्योग सुरू होऊ शकतील.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या महिन्यात लॉक डाऊन आणि संचारबंदी घोषीत केल्याने नाशिकमधील सुमारे चार हजार उद्योग बंद आहेत. आता ते सुरू होण्याची चिन्हे दिसू लागल्याने गेल्या दोन दिवसात तेराशे उद्योगांनी आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत. फक्त ग्रामीण भागातील उद्योग सुरु होतील असे सोमवारी सांगण्यात आले होते.तर सातपूर अंबड येथील उद्योगही सुरु करता येतील असे मंगळवारी सांगण्यात आल्याने मालेगाव वगळता जिल्ह्यातील संपूर्ण उद्योग पूर्ववत होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
कोरोना संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी २३ मार्चपासून ते १४ एप्रिल पर्यंत केंद्रसरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने उद्योगधंदे पूर्णपणे बंद ठेवून कामगारांना सुटी देण्यात आली होती. १४ एप्रिल रोजी पुन्हा ३ मे पर्यंत पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता.परंतु २० एप्रिल नंतर आढावा घेऊन काही ठिकाणी शिथिलता आणण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता.तर उद्योग सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरु लागली होती.यासंदर्भात नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरींग असोसिएशनने पाठपुरावा केला होता. आताही उद्योग सुरू करण्यात मार्गदर्शन आणि अडचणी सोडण्यिासाठी निमाने हेल्प डेस्क सुरू केल्याची माहिती अध्यक्ष शशिकांत जाधव आणि सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी दिली.