नाशिक : शहरातील कुख्यात गुन्हेगार सुनील उर्फ ह्यगटऱ्याह्ण नागु गायकवाड यास (रा.सिध्दार्थनगर,कृषीनगर) अखेर बेड्या ठोकण्यास गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे केलेल्या झोपडीची जाळपोळ, तिबेटीयन मार्केटमधील घरफोडी, कोयत्याचा धाक दाखवून केलेल्या लुटीचा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिसांनी तीन दुचाकी, दोन मोबाइल जप्त केले आहे.११ऑक्टोबर रोजी अनिल कांबळे व त्यांच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत, दमदाटी करुन दोन मोबाइल व साडेपाचशे रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात सुनील उर्फ गटऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गायकवाडवर शहरात विविध गुन्हे दाखल असून तो पोलिसांना विविध गुन्ह्यांत हवा होता. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाग यांना पथक तयार करुन 'गटऱ्या'चा माग काढण्याचे आदेश दिले.
शनिवारी (दि. २८) गटऱ्या हा पेठरोडवरील नवनाथनगरला येणार असल्याची माहिती पथकातील हवालदार प्रवीण कोकाटे यांना मिळाली. कोकाटे यांनी त्वरित वाघ यांना याबाबत माहिती दिली. नवनाथनगर येथे सापळा रचत गायकवाडला पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून मोटारसायकल क्र. (एमएच १७, एएक्स ४२१८), ११ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल, १०० रुपये किंमतीची कटावणी, तसेच मोटारसायकल क्र. (एमएच १७ बीएच ९३४८) व कसारा येथून चोरी केलेली अॅक्टीव्हा क्र. (एमएच ०४ एफएल ५७००) असा एकूण १ लाख ६१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलीस निरिक्षक महेश कुलकर्णी,प्रवीण वाघमारे, शांताराम महाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आठवडाभरापुर्वी खंबाळे येथे सागर खंडू कुवर यांची झोपडी पेटवून दिली होती, अशी कबुलीही गटऱ्याने दिली आहे.