नाशिक : सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी दूषित होऊन ते पिल्याने गावात गॅस्ट्रोची लागण झालेली असली तरी, गेल्या तीन दिवसांत एकापाठोपाठ एक झालेले चारही मृत्यू मात्र गॅस्ट्रोमुळे नव्हे तर अन्य कारणांनी झाल्याचानिष्कर्ष जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे गॅस्ट्रोची लागण होण्यास स्थानिक ग्रामपंचायतच कारणीभूत असल्याचा ठपकाही आरोग्य विभागाने आपल्या अहवालात नोंदविला आहे.सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथे ८ जुलै रोजी दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रोची लागण होऊन ग्रामस्थांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने बोरगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच वणी ग्रामीण रुग्णालयात व तेथून जिल्हा शासकीय रुग्णालयात अधिक उपचारार्थ हलविण्यात आले. गावाच्या ८५० लोकसंख्येतील १८६ जणांना त्याची लागण होऊन प्रकृती गंभीर झाल्याने त्यातील नामदेव मोतीराम गांगुर्डे (५५), बशिºया पांडू लिलके (६५), सीताराम जिवा पिठे (७५) व नवसू बाळू पवार (६५) या चौघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्था खडबडून जागी झाली असून, सदर घटनेची कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आरोग्य विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत या साºया गोष्टीचे खापर ग्रामपंचायतीवर फोडण्यात आले असून, या संदर्भात शासनाला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, दि. ६ व ७ जुलै रोजी परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने गावाला पाणीपुरवठा करणाºया सार्वजनिक विहिरीच्या बाजूने वाहणाºया नाल्याचे पाणी कथड्याच्या छिद्रावाटे विहिरीत गेल्याने विहिरीचे पाणी दूषित झाले व ते पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला, मात्र या साºया गोष्टीस ग्रामपंचायत जबाबदार असल्याचा निष्कर्षही काढण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाणारी टीसीएल पावडर हवाबंद न ठेवता उघड्यावरच ठेवलेली असल्याचेही या चौकशीत आढळून आले असून, १ जूनपूर्वी पाणी तपासणीच्या केलेल्या नोंदी ठेवणारी वही गायब असल्याचे तसेच टीसीएल खरेदीच्या नोंदीदेखील नव्याने भरलेल्या असल्याचे अहवालात नमूद केले आहे. टीसीएलचे नमुने तपासण्यासाठी दिलेले नसल्याचे तसेच सार्वजनिक विहिरीचे पाणी शुद्धीकरण करण्याचे कार्य अनियमित असल्याचा ठपकाही ग्रामपंचायतीवर ठेवण्यात आला आहे.
लागण गॅस्ट्रोची; मृत्यूबाबत निष्कर्ष भलताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:33 AM