चांदवड : शहरात दिवसेंदिवस डेंग्यू आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असून, याबाबत नगर परिषदेला तीन ते चार वेळा उपाययोजना करण्याचे कळवूनही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप केला जात आहे. येत्या आठ दिवसात चांदवड शहरातील साफसफाई व डेग्यूंचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना न झाल्यास शुक्रवार, दि. १६ सप्टेंबरपासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा वरचे गावातील सामाजिक कार्यकर्ते गणेश खैरनार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी दिला आहे. आरोग्य डेंग्यू आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येथील नागरिकांचे धोक्यात आले आहे. यापूर्वी नगर परिषदेला तीन ते चार अर्ज दिले; मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. डेंग्यू आजाराचा फैलाव होऊ नये अशी काळजी घेण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात असले तरी या विभागास नगर परिषदेकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे.यामुळे डेंग्यू आजाराने चांदवड शहरासह परिसरातील एखादा रुग्ण दगावल्यास त्याची जबाबदारी ही नगर परिषद मुख्याधिकारी यांची राहील. डेंग्यूचा फैलाव पाण्यामुळे होत असला तरी पुढील आठ दिवसाच्या आत नगर परिषदेने केरकचऱ्यांची विल्हेवाट लावून औषध फवारणी करावी. आठ दिवसाच्या आत चांदवड शहरातील साफसफाई व डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना न झाल्यास नगर परिषदेसमोर दि. १६ सप्टेंबरपासून आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ( वार्ताहर)
डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव
By admin | Published: September 09, 2016 10:44 PM