पाटोदा : दिवसभर ढगाळ वातावरण व दमट हवामान तर रात्री गारवा तर पहाटे कडाक्याची थंडी व दव आणि धुके अशा बदलत्या वातावरणाचा फटका येवला तालुक्यातील गहू पिकाला बसला आहे.कडाक्याची थंडी व ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे तर गव्हावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मावा रोगामुळे तालुक्यातील सुमारे सहा हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र धोक्यात आले आहे .सर्वच पिकांवर या वातावरणाचा परिणाम होत असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला असून आता तो पूर्णपणे हबकून गेला आहे.यावर्षी येवला तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे साठवण बंधारे पूर्णक्षमतेने भरले आहे. विहिरी बोअरवेल ,विंधनविहिरींना मुबलक पाणी असल्याने तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळे बांधलेले असून त्या माध्यमातूनही पाणी उपलब्ध झालेले असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे सात हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी केली आहे.मात्र सुरु वातीच्या काळात ढगाळ हवामान दव व धुके या मुळे पिकांची पूर्णता वाट लागली आशाही स्थितीत शेतकरी वर्गाने औषधांची मात्रा वापरीत पिकांवरील रोगांना नियंत्रणात आणले.मात्र गेल्या पाच सहा दिवसांपासून पडणार्या कडाक्याच्या थंडीमुळे व त्यानंतरच्या ढगाळ हवामानामुळे गव्हावर मावा किडीचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे जादा औषध फवारणी करूनही मावा आटोक्यात येत नसल्याने पिक धोक्यात आले आहे.आज कडाक्याची थंडी तर उद्या ढगाळ हवामन दव व धुके या वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकांवर कोणती औषध फवारणी करावी असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.ढगाळ हवामांमुळे गहू पिकावर मावा किडीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून किडीच्या विश्तेद्वारे गव्हाच्या पानावर ,खोडावर तसेच कोवळ्या शेंड्यावर असलेल्या माव्यामुळे पिकांची वाताहत झाली आहे.
गव्हावर मावा रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:53 PM