सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात खरीप मका पाठोपाठ आता रब्बी हंगामात पेरणी झालेल्या मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मका पिकावर औषध फवारणीच्या खर्चाला शेतकरी वर्गाला सामोरे जावे लागत आहे.साधारणत: तीन आठवड्याच्या मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसु लागला आहे. अळी मकाच्या पोंग्यात असल्याने औषध फवारणीचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी यावर पर्याय म्हणून प्रत्येक मका झाडावर प्लास्टीक बाटलीत औषध घेऊन ओळीने गाभ्यात औषध टाकण्याची क्लृप्ती शेतकरी वापरताना दिसत आहे. वेळ तसेच मजूर अधिक लागत असल्याने खर्चात वाढ होत अअसल्याचे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे.लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने पीक हातचे जाण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. बाजारात मक्याचे वाढलेले दर तसेच मागणी लक्षात घेऊन औषध फवारणीला हात आखडता न घेता औषध फवारणीवर लक्ष देत आहे. वावी, पाथरे, वारेगाव, सायाळे, मलढोण, पांगरी, भोकणी, सुरेगाव, खंबाळे आदी दुष्काळी भागात यंदा प्रथमच मका पीक दिसू लागले आहे. दुग्धव्यवसाय या भागात असल्याने मका पीक जनावरांचा चारा म्हणून तसेच जनावरांना मका भरडा खाद्याच्या रूपात देता यावा यासाठी मका पिकाची निवड शेतकरीवर्गाने करण्यात आली. मात्र, लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
मका पिकावर लष्करी अळीचा प्रार्दूभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 3:15 PM