पंचवटी : पेठरोडवरील मखमलाबाद शिवारात असलेल्या मनपा प्रभाग क्रमांक ६ मधील मेहेरधाम परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला असला तरी याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे पंचवटी प्रभाग समिती सभापती सुनीता पिंगळे यांचा हा प्रभाग असला तरी पालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे.मेहेरधाम, यशोदानगर या भागात गेल्या अनेक दिवसांपासून डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम राबविली गेलेली नाही किंवा संबंधित विभागामार्फत औषध वा धूर फवारणी केली जात नाही. परिसरात डास निर्मूलन मोहीम राबवावी, यासाठी अनेकदा पालिकेकडे तक्रार केली आहे, मात्र तरीदेखील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार परिसरात राहणाºया नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असल्याने नागरिकांना मलेरिया तसेच डेंग्यूसदृश आजारांना सामोरे जावे लागत आहे, तर काही दिवसांपासून यशोदानगर भागातील काही नागरिकांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली असल्याचे रहिवाशांनी सांगितले. प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने आम्ही प्रशासनाला कर का भरायचा, असा संतप्त सवाल नागरिकांनी करून प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनपाने स्वच्छता मोहीम राबविण्यापाठोपाठ धूर व औषध फवारणी करून डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम न राबविल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.पेठरोडवरील मेहेरधाम (यशोदानगर) परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या परिसरात काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र तरीदेखील प्रशासनाकडून परिसरात धूर वा औषध फवारणी मोहीम राबविली जात नसल्याने परिसरातील नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. डेंग्यूसदृश आजाराचे संशयित रुग्ण वाढल्यानंतर मनपा प्रशासन दखल घेणार का?- दीपक लोंढे, स्थानिक रहिवासीडेंग्यूसदृश आजाराने मूृत्यूयशोदानगर परिसरात राहणाºया केवळराव सूर्यवंशी या ज्येष्ठ नागरिकाला डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी (दि.२५) सकाळी सूर्यवंशी यांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सभापतींच्या प्रभागात डासांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:56 AM