इंदिरानगर : सूचितानगर येथील राज अपार्टमेंटमधील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने केलेले अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने उद््ध्वस्त केले. राज अपार्टमेंटमध्ये २२ सदनिका असून, याठिकाणी शिवसेनेचे सहकार व उद्योग आघाडीचे पदाधिकारी हेमंत दीक्षित यांनी याच इमारतीच्या आवारात अतिक्रमण केले होते. अपार्टमेंटच्या पाठीमागील बाजूस दीक्षित यांनी चार बाय दहा आकाराची खोली बांधली होती. त्याठिकाणी गटार तुंबली असली तरी अनधिकृत बांधकामामुळे याठिकाणी स्वच्छतेसाठी अडचण येत होती. गटार तुंबल्याने घाण आणि दुर्गंधीचा नागरिकांना त्रास होत होता. यामुळे येथील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तोडून टाकावे यासाठी नागरिक प्रयत्न करीत होते. येथील रहिवासी सुनीता जाधव, रंजना पवार, सुनीता बेलापूरकर, नलिनी शहाणे, गजानन कुलकर्णी, ईश्वर पवार, सुनील शिंदे, ललिता कापडणे यांनी थेट महापालिकेकडे तक्रार केली होती. परंतु राजकीय दबावामुळे अतिक्रमण हटविले जात नसल्याचा नागरिकांचा आरोप होता. अखेरीस महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यापर्यंत हा विषय गेल्यानंतर त्यांनी तातडीने अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी दीक्षित यांना महापालिकेने नोटीस बजावली होती. परंतु त्यानंतरही त्यांनी अतिक्रमण न हटविल्याने सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण हटविले. अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम, सहायक आयुक्त सोमनाथ वाडेकर, पूर्व विभागाच्या विभागीय अधिकारी मालिनी शिरसाट यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
सूचितानगरमधील बांधकाम उद्ध्वस्त
By admin | Published: December 23, 2014 10:33 PM