नाशिकरोड : शाळांची श्रेणी सुधारण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी विभागीय आयुक्तालयाने शैक्षणिक गुणवत्ता विकास कृती कार्यक्रम हाती घेतला असून, शैक्षणिक गुणवत्ता कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षामार्फत सर्व शाळांची माहिती आॅनलाइन संकलित केली जाणार असून, माहितीचे विश्लेषण करून संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश, कृती कार्यक्रमानुसार संनियंत्रण करून शाळांची श्रेणी सुधारणे व गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. या आराखड्यात शाळा, विद्यार्थी, शिक्षक मूल्यमापन, श्रेणी सुधारणा, प्रभावी पर्यवेक्षण व प्रशासकीय यंत्रणा, तपासणी पथके, व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पर्यवेक्षणासाठी कर्तव्ये व जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचा कृती आराखड्यात समावेश केला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने पालकांचे मेळावे घेऊन विद्यार्थ्यांना चौथी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्यात येईल. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी विभाग स्तरावरील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी, जिल्हा प्रकल्प अधिकारी यांच्या उपस्थितीत कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)