नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणांना पुन्हा एकदा जबाबदारीने काम करावे लागणार असून पहिल्या लाटेत केलेले काम आणि त्याबाबतच्या माहितीचे दस्ताऐवजीकरणदेखील उपयुक्त ठरणार असल्याचे अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) गृह विभाग तथा जिल्ह्याचे पालक सचिव आनंद लिमये यांनी सांगितले. या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली, त्या बैठकीत लिमये बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
कोरोनाच्या संकट काळात नाशिक जिल्ह्याने शासनाच्या ध्येय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केल्याचे दिसून येते. कोरोनाच्या आपत्तीजनक परिस्थिती असतानाही जिल्ह्याने तत्परता दाखवून कामकाज केले. अशी कामे करतांना काही अडचणी किंवा समस्या असतील तर तसे प्रस्ताव सादर करावेत. सदर प्रस्ताव जलदगतीने मार्गी लावले जातील, असे लिमये यांनी यावेळी सांगितले. कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करून वरिष्ठ पातळीवर त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी सूचनाही लिमये यांनी केली.
दरम्यान, आढावा बैठकीत आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, कृषी विभाग, वनविभाग, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग, शहरी व ग्रामीण पोलीस विभाग, पीक कर्जमाफी योजना, सहकार विभाग तसेच जिल्हा परिषदे अंतर्गत असणाऱ्या कामांचे व इतर संबंधित विभागांचे सादरीकरण करण्यात आले.
=---इन्फो--
--आपत्ती व्यवस्थापन पुस्तिकेचे प्रकाशन---
आपत्ती संबंधित सर्व विभागांना एकत्रित जोडण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत पूर परिस्थितीतील लघुकृती आराखडा माहिती देणारी पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तकामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आणि पत्ते देण्यात आले आहे. सदर पुस्तिकेचे अनावरण विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव आनंद लिमये यांच्या हस्ते करण्यात आले.
===Photopath===
180621\18nsk_46_18062021_13.jpg
===Caption===
जिल्ह्याचे पालक सचिव आनंद लिमये यांना आपत्ती विषयक लघुकृती आराखडा पुस्तिकेची माहिती देतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे, समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे