पाथर्डी फाटा : चालू शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता सातवी व नववीचा अभ्यासक्र म बदलण्यात येऊन शाळांच्या तासिकांमध्येही बदल करण्यात आला आहे. मात्र या बदलांमध्ये इंग्रजी विषयाच्या तासिका कमी करण्यात आल्याने इंग्रजी शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. इंग्रजीसारखा काठिण्यपातळीचा व उपक्रमशील विषयाला मराठी व हिंदी विषयाइतक्याच तासिका देण्यामागे धोरणकर्त्यांची भूमिका नेमकी काय आहे, हे समजत नसल्याचे इंग्रजीच्या शिक्षकांचे म्हणणे आहे.आतापर्यंतच्या शाळांच्या विषयांनुसार तासिका नियोजनामध्ये पाचवी व दहावीपर्यंत आठवड्याला मराठीसाठी सहा व हिंदी साठी चार तासिका होत्या. इंग्रजी विषयाच्या अध्यापनाला अधिकच वेळ मिळावा, विद्यार्थ्यांनाही मराठी व हिंदीच्या तुलनेत इंग्रजी समजण्यासाठी अधिक वेळ लागतो, त्याचा सराव अधिक करावा लागतो, या गोष्टी लक्षात येऊन पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी आठवड्याला सात तासिका होत्या, तर नववी व दहावीसाठी आठ तासिका होत्या. त्या आता चालू शैक्षणिक वर्षांपासून सर्व वर्गांना सहाच तासिका करण्यात आल्या आहेत. तासिका वाढवून द्यायला हव्या होत्या, निदान आहेत त्यातही तशाच ठेवायच्या होत्या. त्याऐवजी नववी व दहावीच्या आठऐवजी सहाच तासिका केल्या गेल्याने तासिका वाढवून देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. एकीकडे शासन मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा नीटपणे अवगत होऊन त्यांना ती समजणे, वाचणे, बोलणे व लिहिणे ही कौशल्ये प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे उपक्र म राबवते. पहिलीपासून इंग्रजी, इंग्रजी विषय शिक्षकांची वेगवेगळी प्रशिक्षणे, कार्यशाळा व प्रशिक्षणं घेणे, अशा अनेक गोष्टी शासन करत असताना अध्यापकाच्या तासिका कोणत्या निकषावर कमी करण्यात आल्या.
इंग्रजीच्या तासिकांमध्ये कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:39 AM