वंजारी महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी छबू कांगणे
सिन्नर : तालुक्यातील गुळवंच येथील सामजिक कार्यकर्ते छबू मधुकर कांगणे यांची वंजारी महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वंजारी महासंघाचे संपर्कप्रमुख खंडेश्वर मुंडे यांनी कांगणे यांची नियुक्ती केली. या निवडीचे गुळवंच व तालुक्यात स्वागत करण्यात आले.
ग्रामीण भागात कोरोना लसीकरणास प्रारंभ
सिन्नर : सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाच्या कामास प्रारंभ झाला आहे. देवपूर, नायगाव आणि वावी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. बुधवारी तालुक्यातील फ्रंटलाइन वर्कर्सना लसीकरण करण्यात आले. प्रत्येक बुधवारी महसूल, पोलीस आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. बुधवारपर्यंत १४७५ जणांना लसीकरण करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९०१ जणांना लसीकरण करण्यात आले. विविध कारणास्तव ५६८ व्यक्ती या लसीकरणास गैरहजर राहिल्या.
निवडणूक खर्च सादर करण्याचे आवाहन
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली होती. मतमोजणी १८ जानेवारी रोजी झाली होती. त्यानंतर महिन्याने निवडणूक खर्च सादर करणे अपेक्षित आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक खर्च सादर करण्याचे आवाहन तहसीलदार राहुल कोताडे यांनी केले आहे. महिन्याभरात निवडणूक खर्च सादर न केल्यास उमेदवारांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
डुबेरे येथे उद्या खंडेराव महाराज यात्रोत्सव
सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथील ग्रामदैवत खंडेराव महाराज यांचा यात्रोत्सव शनिवार १३ रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून केवळ धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळी देवाची विधिवत पूजा, महाआरती, मिरवणूक, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यावेळी भाविकांनी मास्क व कोरोनाच्या नियमांचे बंधन पाळून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.