नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तिकीट वाटपासाठी दोन लाख रुपयांची मागणी केल्याची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर तिकीट नाकारण्यात आलेल्या नाराज कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. १०) पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट नाकारून दुसऱ्या पक्षातून आलेल्या आगंतुकांना पैसे घेऊन तिकिटांचे वाटप करण्यात आल्याचा आरोपही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात महापालिका निवडणुकीचा ध्येयनामा प्रकाशित करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन येथे आले असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन तिकीट वाटपाविषयी गाऱ्हाणे मांडले. तिकीट वाटपामुळे नाराज झालेल्या इच्छुकांपैकी काही कार्यकर्त्यांची समजूत घालण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना यश आले. पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर नाराजांचे समाधान झाले आहे. त्यांना आगामी काळात महत्त्वाची जागा दिली जाण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते. पक्षाच्या निष्ठावंतांना नाकारून तिकीट दिल्याचा आरोप करीत भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली होती. त्यातील काहींची मनधरणी करण्यात पक्षाला यश आले होते. परंतु, काही कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत तिकीट वाटपाचा मुद्दा लावून धरण्याचे संकेत दिले होते. अशाच नाराज कार्यकर्त्यांपैकी गणेश कांबळे यांनी, तर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही दिला. परंतु, पक्षाचे संघटनमंत्री किशोर काळकर यांनी मध्यस्थी करून त्यांची व पालकमंत्र्यांची भेट घडवून दिली. गणेश कांबळे हे अनुसूचीत जाती जमाती मोर्चाचे माजी प्रदेश पदाधिकारी असून प्रभाग १२ मध्ये त्यांची पत्नी आशा चव्हाण यांनी दावा केला होता. परंतु माजी शहराध्यक्षांनी जाणिवपूर्वक अन्याय करून कॉंग्रेस कार्यकर्ते किशोर घाटे यांच्या कन्येला उमेदवारी दिली, असा त्यांचा आरोप आहे. पालकमंत्र्यांनी कांबळे यांची मनधरणी केली आणि भाविष्यात पक्षाकडून चांगली जबाबदारी देण्याचे संकेत दिल्यानंतर कांबळे व समर्थकांनी कार्यालय सोडले, तर स्मीता बोडके या नाराज महिला कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांसमोर हंबरडा फोडीत त्यांची व्यथा मांडली. पक्षाच्या सूचनेनुसार निवडणुकीच्या तयारी केल्यानंतर निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी लागली. तसेच माघार घेऊनही वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला धमकावले जात असल्याचा आरोप करीत त्यांनी पालकमत्र्यांसमोर त्यांची नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
नाराजांची गाऱ्हाणी पालकमंत्र्यांच्या पुढ्यात्रे
By admin | Published: February 11, 2017 12:19 AM