बुधवारी (दि.२) सायंकाळी औरंगाबाद महामार्गावर शिलापूरजवळ एका बिबट्याला वाहनाने धडक दिली; मात्र धडक जोरदार नसल्याने बिबट्या बालंबाल बचावला. दरम्यान, निफाडबाजूने नाशिककडे जाणारी वाहने धावत असतानाही बिबट्या काही मिनिटे रस्त्यावर बसून होता. भोवळ उतरल्यानंतर बिबट्या हळूच उठला आणि रस्त्यालगतच्या झाडीझुडुपांमधून शिलापूर गावाच्या शिवारात गेला. यावेळी येथील एका घराच्या भिंतीच्या आडोशाला पुन्हा बिबट्याने विसावा घेतला आणि द्राक्षबागेच्या दिशेने पलायन केले. यावेळी जमलेल्या काही नागरिकांनी बिबट्याचा हा घटनाक्रम मोबाइल कॅमेऱ्यात टिपला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फिरतोय. घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी कर्मचाऱ्यांसह शिलापूर गाठले. यावेळी त्यांनी परिसरात सर्च बॅटऱ्यांद्वारे शाेध घेतला असता जवळपास कोठेही बिबट्या नजरेस पडला नाही. यावेळी त्यांनी नागरिकांना खबरदारीच्या सूचना देत संध्याकाळी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले. या परिसरात ताबडतोब पिंजरा लावावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गुरुवारी (दि.३) सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वत्र पुन्हा शोधमोहीम राबविली, मात्र बिबट्या आढळून आला नाही. बिबट्या जखमी असल्याने येथील नागरिक व परिसरातील शेतकरी अधिकच धास्तावले आहेत.
जखमी बिबट्याचा शिलापूरमध्ये वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:41 AM