सातपूर : उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात दिलेली सवलत पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवल्याने नाशिकमधील उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकचे पालकत्व स्वीकारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकलाही सवलत कधी देणार, असा प्रश्न या निमित्ताने उद्योजकांनी केला आहे.मागील तीन वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात सवलत दिली आहे. अशीच सवलत नाशिकमधील उद्योजकांनाही मिळावी, अशी आग्रही मागणी गेल्या तीन वर्षांपासून उद्योजक करीत आहेत. ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निमा पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट घेऊन सवलतीची मागणी केली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी ही मागणी सपशेल फेटाळून लावली आहे. नाशिकमधील भाजपाचे आमदारांनादेखील बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. परंतु उपयोग झालेला नाही. ही मागणी कायम असताना मंगळवारी (दि.२८) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदर्भ, मराठवाड्याला वीज दरातील सवलत पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती समजताच उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारने उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विदर्भ व मराठवाड्याला सवलत देण्यास हरकत नाही. हीच सवलत नाशिकलाही देण्यात यावी, अशी मागणी आहे. राज्यातील उद्योजकांना विजेचे दर वेगवेगळे का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी सापत्नभावाची वागणूक देऊ नये, अशाही भावना व्यक्त होत आहे.
उत्तर महाराष्टतील उद्योजकांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:47 AM