धनंजय रिसोडकर / नाशिकनाशिक : जळगावातील एम. जे. कॉलेजमध्ये झालेल्या शालेय विभागीय मल्लखांब स्पर्धेत नाशिक शहरातून गेलेल्या आणि स्पर्धेत सर्वोत्तम सादरीकरण करून अधिक गुण मिळालेल्या खेळाडूंना डावलून अनधिकृत पंचांच्या नात्यागोत्यातील खेळाडूंना प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसे प्रदान करण्यात आली. तर ज्यांनी सर्वोत्तम सेटचे सादरीकरण केले, त्यांना स्पर्धेबाहेर काढण्यात आले. त्याबद्दल जळगावच्या क्रीडा अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवत तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याने जिल्हा मल्लखांब असोसिएशनसह मल्लखांबपटूंसह पालकांनी नाशिकच्या जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांसह, क्रीडा सचिव आणि थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार नोंदवत दाद मागण्यात आली आहे.
जळगावला १७ वर्षांखालील वयोगटातील विशेष म्हणजे या स्पर्धेत नाशिक विभागातील अधिकृत पंच नसल्याने स्थानिक पंचांकडून मल्लखांबपटूंच्या संच सादरीकरणाला गुण देण्यात आले होते. या बाबतीत नियमानुसार रक्ताच्या नात्यातील खेळाडू खेळत असल्यास तिथे संबंधित पंचाला पंच म्हणून कर्तव्य करण्याची परवानगी नसते. मात्र, जळगावच्या स्पर्धेत पंचाच्या नात्यातील खेळाडूंना खेळवून तसेच त्यांचे सादरीकरण अत्यंत सर्वसाधारण असल्याने कमी गुण मिळाले असतानाही त्यांना विजयी घोषित करण्याची कामगिरी करण्यात आली. गत काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होत असल्यानेच नाशिक जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह पालकांकडून याप्रकरणी आक्रमक भूमिका स्वीकारत क्रीडा विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांसह थेट पंतप्रधान कार्यालयाकडेच त्याबाबत दाद मागण्यात आली आहे.