याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, योगेश हा सातत्याने विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होता. त्याच्याविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात हाणामाऱ्यांसारखे शरीराविरुध्दचे विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्या तडीपार प्रस्तावाची चौकशीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. याअगोदर एकदा त्याच्या विरूध्दचा तडीपारीचा आदेश रद्दही झाला होता. दरम्यान, योगेश याने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत ‘मला भद्रकालीच्या वराडे साहेबाने प्रचंड त्रास दिलेला आहे, तुझ्याकडे थोडे दिवस बाकी आहेत, तुला जेवढे जगायचे आहे, तेवढे जगून घे... त्यांनी मला खूप त्रास दिला आहे, त्यांनी फाशी घ्यायला मला मजबूर केलं आहे. माझ्या आई - वडिलांना, भावाला त्रास देऊ नका, वराडे साहेबांनीच मला त्रास दिला आहे, बाकी कुणी नाही’ असे योगेश व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभर हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत होता. पोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडिओमधून समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या आकस्मिक मृत्यूचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट - १कडे वर्ग करण्यात आला असून, ते याबाबत पुढील तपास करणार आहे.
---कोट---
काही दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांनी विविध सराईत गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्याचे वॉरंट काढले होते. त्यावेळी योगेशच्या राहत्या घराचीही झडती घेण्यात आली होती. मात्र ,त्याच्या घरात कुठल्याही प्रकारचे शस्त्र वगैरे आढळून आले नसल्याने पंचनामाही ‘नील’ स्वरुपात लिहिला आहे. योगेशविरुध्द हाणामाऱ्या, दंगलसारखे गुन्हे यापूर्वीही दाखल असून, त्याच्या दुसऱ्यांदा आलेल्या तडीपार प्रस्तावाची चौकशीही जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली होती.
- अमोल तांबे, पोलीस उपायुक्त