नाशिक : ओझर येथील नाशिक विमानतळावरील झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी आणि भ्रष्टाचारामुळे अपवित्र झालेला विभाग या पाशर्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्क मुख्य अभियंत्याच्या कार्यालयात गोमूत्र शिंपडून अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी गांधीगिरी पद्धतीने पोेवाडे गात व घोषणाबाजी करण्यात आली.१ फेब्रुवारी रोजी बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने ओझर येथील विमानतळाच्या संरक्षित ठिकाणी साग्रसंगीत पार्टी करण्यात आली. ठेकेदाराच्या संघटनेच्या वतीने झालेल्या या पार्टीमध्ये लावण्यांचाही कार्यक्रम झाला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग चर्चेत आला आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. मुख्य अभियंता किरण माने यांच्या दालनात बैठक सुरू असताना आंदोलक घुसले. यावेळी माने यांनी आपण नुकताच कार्यभार स्वीकारला आहे, असे सांगितले. तथापि, दालनात एकीकडे शेतकरी आत्महत्त्या करीत असताना शासन नुसतेच पॅकेज जाहीर करते, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळत नाही की शासनाने घोषित केलेल्या पॅकेजची मदत मिळत नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या खिशातून कररूपी गोळा केलेल्या रकमेतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निकृष्ट कामे केली जातात. अशा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त लाखो रुपयांची उधळपट्टी करीत संवेदनशील जागेत पार्टी करणे म्हणजे शेतकऱ्यांची व जनतेची क्रूर चेष्टा आहे. त्यामुळेच ओझर येथील नाशिक विमानतळावरील झालेल्या या साग्रसंगीत पार्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आणि अपवित्र झालेले हे खाते पवित्र होण्यासाठी बाटलीतून आणलेले गोमूत्रच शिंपडले. यावेळी जिल्हा प्रवक्ते हंसराज वडघुले, नितीन रोटे, शरद लभडे, शशी कटारे, किरण देशमुख, रामदास उन्हाळे, सुनील कांबळे आदि उपस्थित होते. आक्रमक आंदोेलनासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावेळी चक्क गांधीगिरी पद्धतीने शाहीर बोलवून ‘गरिबीनी झालीय दैना, महागाई जगू देईना’ असे पोवाडे गात घोषणाबाजी केली. (प्रतिनिधी)
गोमूत्र शिंपडून अभिनव आंदोलन
By admin | Published: February 10, 2015 1:56 AM