नाशिक : महापालिकेत दररोज उघडकीस येणारे घोटाळे आणि आरोप प्रत्यारोपानंतर थंडबस्त्यात जाणाऱ्या चौकशा याचा विचार करून महापौर सतीश कुलकर्णी यांनी टीडीआर घोटाळ्याप्रकरणी चौकशी समिती गठीत करण्याची घोषणा सोमवारी (दि.७) महासभेत केली. त्यामुळे आता आरोप प्रत्यारोप असलेल्या घोटाळ्यांची बऱ्यापैकी तड लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर पंचवटीत क्रीडांगणाच्या भूखंडाबाबत झालेल्या घोटाळ्याबाबत आयुक्तांना चौकशी आणि संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे सर्वाधिकार देण्यात आल्याचे महापौरांनी जाहीर केले. महापौरांनी केलेल्या घेाषणेनुसार अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आले असून, त्यात सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, शिवसेना गटनेता विलास शिंदे तसेच नगररचना विभागाचे सहायक संचालक सोनकांबळे, मुख्य लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे यांचा समावेश असणार आहे.
महापालिकेची महासभा होत असताना भाजपच गटनेता जगदीश पाटील यांनी पंचवटीतील टीडीआर घोटाळ्याचा विषय मांडला होता. पंचवटीत क्रीडांगणासाठी राखीव असलेले राखीव भूखंड (सर्व्हे नंबर १५९) भाग यावर मंजूर आरक्षणानुसार जागामालकाकडून जागा ताब्यात घेण्यात आली आणि त्या बदल्यात टीडीआर देण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात अतिक्रमणमुक्त प्लॉट देणे आवश्यक होते, परंतु तसे झालेले नाही. त्याचप्रमाणे याठिकाणी महापालिकेने दिलेला टीडीआरदेखील संबंधित जागामालकाने विकून टाकला परंतु सातबारा उताऱ्यावर महापालिकेचे नाव लागलेले नाही, असा आरोप पाटील यांनी केला. जागामालक मुजाेरीने अतिक्रमण करून राहणाऱ्यांना महापालिकेचे मंजूर काम थांबविण्यास भाग पाडतो तसेच मनपाने नियुक्त केलेल्या सर्व्हेअरदेखील जागामालक सांगतो त्याच ठिकाणी रेखांकन करतो, असा आरोप पाटील यांनी करतानाच या प्रकरणाची मूळ नस्ती नगररचना विभागातून गायब आहे. या जागेत मनपाच्या माजी अधिकारी आणि नगरसेवकाची भागीदारी असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. त्यानंतर विलास शिंदे यांनीदेखील अनेक आरक्षित भूखंड अशाच प्रकारे अतिक्रमण न हटविता महापालिकेच्या माथी मारण्यात आले आणि मोबदला म्हणून टीडीआर लाटल्याचे आरोप केले.
महापौर सतीश कुलकर्णी यांनी जगदीश पाटील यांनी केलेल्या आरोपासंदर्भात आयुक्तांना चौकशी आणि फौजदारी कारवाईचे अधिकार दिले आहेत, तर दुसरीकडे अन्य घोटाळ्यांच्या चौकशीसाठी समितीदेखील नियुक्त केली.
इन्फो...
वादग्रस्त अष्टीकरांची मनपातून हकालपट्टी
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांनी तातडीने त्यांच्या मूळ सेवेत पाठविण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. कोरोनाची जबाबदारी असतानाही दीर्घकाळ सुटी टाकून ते निघून गेल्याने सभागृह नेता सतीश सेानवणे यांनी नाराजी व्यक्त केली. त्या आनुषंगाने महापौरांनीदेखील संताप व्यक्त केला. कोरोनाच्या संकटकाळात सर्वांनी सजग होऊन काम करावे. अन्यथा गय केली जाणार नाही.