पंचवटी : पती तसेच सासरकडच्या मंडळींवर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये खंडणी मागितल्याच्या प्रकरणात संशयित महिलेस अर्थपूर्ण संबंधातून मदत केल्याच्या आरोप असलेले म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांची चौकशी सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी दिली आहे.गेल्या आठवड्यात आरटीओ साईनगर येथील प्रवीण गांगुर्डे याचा धुळे जिल्ह्यातील स्वाती पगारे हिच्या बरोबर विवाह झाला होता़; मात्र त्यानंतर दोघात वाद झाल्याने पती गांगुर्डे यांच्यासह सासरच्या मंडळीविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संशयित पत्नी हिने गुन्हा मागे घेण्यासाठी ४० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणानंतर गांगुर्डे यांच्या आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला होता याबाबत गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पत्नी स्वाती गांगुर्डे, उषा पगारे, सागर पगारे, विशाखा पगारे, पंकज राजबली मनोहर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणात मदत केल्याच्या आरोपावरून गांगुर्डे यांच्या नातेवाइकांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांनी मदत केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी हिरे यांच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर हिरे यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
म्हसरूळ पोलीस ठाण्यातील ‘त्या’ उपनिरीक्षकाची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 1:06 AM