नाशिक - पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच नवजात अर्भक दगावल्याचा आरोप करत मृत अर्भक थेट महापालिका मुख्यालयात घेऊन येण्याची घटना मंगळवारी घडल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सारवासारव चालविली असून बचावाची भूमिका घेतली जात आहे. मात्र, महापौरांनी आयुक्तांची भेट घेत या सा-या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अतिरिक्त आयुक्त व वैद्यकीय अधिक्षकांकडून चौकशीचा अहवाल मागविला आहे.इंदिरागांधी रुग्णालयात आशा तांदळे या गर्भवती महिलेला प्रसुतिकळा येत असतानाही तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने नवजात अर्भक दगावल्याचा आरोप तिच्या पतीसह आईने केला होता. याशिवाय, सदर महिलेच्या आईने मृत अर्भक घेऊन महापालिका मुख्यालय गाठले होते आणि अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलावरच मृत अर्भक ठेवत कारवाईची मागणी केली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, डॉ. भंडारी यांनी बुधवारी (दि.२०) पत्रकारांशी बोलताना या सा-या प्रकरणाबाबत बचावाची भूमिका घेतली आणि अतिशयोक्तिपूर्ण विधाने करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन या गंभीर प्रकरणाबद्दल सखोल चौकशी होऊन कारवाईची मागणी केली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी सांगितले, या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असून अतिरिक्त आयुक्त व वैद्यकीय अधिक्षकांकडून सविस्तर चौकशी अहवाल मागविण्यात आला आहे. सदर नवजात बाळाच्या फुफ्फुसात पाणी गेले होते. ते परिचारिकांनी बाहेर काढले. मात्र, बाळ रडत नसल्याने डॉक्टरांनी शताब्दी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचे सांगितले. सदर व्यक्तीकडे पिवळे रेशनकार्ड असल्याने त्यांना राजीवगांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचाराचा लाभ मिळावा म्हणून शताब्दी हॉस्पिटलची शिफारस करण्यात आली. इन्क्युबेटर्ससह अॅम्ब्युलन्सची सुविधा केवळ शताब्दी हॉस्पिटलकडेच असल्याने या रुग्णालयाचे नाव सुचविण्यात आले. जिल्हा रुग्णालय व बिटको रुग्णालयाकडे अशी अॅम्ब्युलन्स उपलब्ध नाही. शताब्दी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बाळाचा मृत्यू झालेला आहे. परंतु, नेमके या रुग्णालयात काय घडले याचाही अहवाल मागविण्यात आला आहे. खासगी रुग्णालयाचीही त्यात चूक असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. महिलेच्या नातेवाईकाने ज्या तक्रारी केल्या आहेत त्याबाबतही शहनिशा करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्पष्ट केले.
नाशिकमधील अर्भक मृत्यूप्रकरणी महापालिका आयुक्तांनी मागविला चौकशीचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 6:01 PM
महापौरांकडून चौकशीची मागणी : दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन
ठळक मुद्दे खासगी रुग्णालयाचीही त्यात चूक असेल तर त्यांच्यावरही कारवाई महिलेच्या नातेवाईकाने ज्या तक्रारी केल्या आहेत त्याबाबतही शहनिशा करुन दोषींवर कठोर कारवाई